लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : मोरगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली असून या धोकादायक इमारतीच्या दोन खोल्यात वर्ग भरत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून चिमुरड्याच्या जीवाशी खेळ केला जात आहे. आगामी शैक्षणिक सत्रापूर्वी शाळेची नवीन इमारत अथवा डागडूजी झाली नाही तर शाळा व्यवस्थापन समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.मोरगाव येथे वर्ग एक ते आठ पर्यंतची शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहे. येथे १८६ विद्यार्थी विद्यार्जन करीत आहेत. उपलब्ध असलेल्या वर्गखोल्यांत तीन वर्गखोल्या कमी आहेत. वर्ग सुरु असताना एकदा कवेलू पडल्याचे सांगण्यात येते. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. शाळेत एक सांस्कृतिक सभागृह आहे. मात्र त्याची पण अवस्था अंत्यत दयनीय आहे. ही इमारत अत्यंत जुनाट असून इमारतीचे अस्तरीकरण ठिकठिकाणी तुटलेले असून कधीही धोका संभवतो.यासंबंधात शाळा व्यवस्थापन समितीने अनेकदा ठराव पारीत करुन भीषण वास्तवाची कल्पना ग्रामपंचायत व पंचायत समितीला लेखी पत्राद्वारे कळविली आहे. मात्र याकडे सातत्याने कानाडोळा केला जातो असा आरोप शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे. दुर्दैवाने एखादी गंभीर घटना घडल्यास त्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाला जबाबदार धरण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.आगामी शैक्षणिक सत्रापूर्वी शाळा इमारतीचा प्रश्न व जुनाट जलशुद्धीकरण यंत्राच्या पुरवठ्यासंदर्भात निर्णय न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ३० एप्रिलच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मुनेश्वर शहारे, वैशाली गोबाडे, हेमंत लाडे, आसाराम सोनवाने, तानाजी लोदी, नरेंद्र लाडे, मनिषा शहारे, विद्या शहारे उपस्थित होते.जुन्या जलशुद्धीकरण यंत्राचा पुरवठाविद्यार्थ्यांना शुद्ध पेयजल उपलब्ध करुन देण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतच्यावतीने जलशुध्दीकरण यंत्र पुरविण्यात आले. या यंत्राची किंमत ९८ हजार रुपये असल्याचे सांगण्यात येते. मात्र ज्यावेळी या यंत्राचा पुरवठा करण्यात आला तो जुनाट होता असा शाळा समितीचा आरोप आहे. जलशुद्धीकरण यंत्र देऊन ग्रामपंचायत मोकळी झाली. मात्र यासाठी आवश्यक वीज जोडणी करुन देण्यात आली नाही. शाळा प्रशासनाने एक हजार ८०० रुपये किंमतीचे इलेक्ट्रीक साहित्य खरेदी करुन जोडणी केली व हे जलशुद्धीकरण यंत्र सुरु करण्याचा प्रयत्न केला. मात्र यात वारंवार बिघाड होत असल्याने विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. शाळेने केलेल्या खर्चाचे बिल ग्रामपंचायतला सादर केले. मात्र त्याची पूर्तता अद्यापही शाळेला करण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले. जुनाट जलशुद्धीकरण यंत्राचा पुरवठा करण्यात आल्याची तक्रार शाळा व्यवस्थापन समितीसह काही सुज्ञ गावकऱ्यांनी वर्षभरापूर्वीच केली मात्र या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला कुणाकडेही सवड नाही.
मोरगावची शाळा इमारत जीर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2019 9:13 PM
मोरगावची जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इमारत जीर्ण झाली असून या धोकादायक इमारतीच्या दोन खोल्यात वर्ग भरत आहेत. जिल्हा परिषद प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असून चिमुरड्याच्या जीवाशी खेळ केला जात आहे.
ठळक मुद्देदोन खोल्या धोकादायक : शाळा व्यवस्थापन समितीचा आंदोलनाचा इशारा