गोंदिया : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग हळूहळू पाय पसरत आहे. त्यातच गोंदिया तालुक्यातील रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २२७ वर पोहोचली आहे. तालुक्यात कोरोनाचा विळखा वाढत असल्याने नागरिकांनी वेळीच सावध होत उपाययोजनांचे काटेकोरपणे पालन करण्याची गरज आहे. अन्यथा जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्ह्यात शनिवारी (दि. २० मार्च) ५३ कोरोनाबाधितांची नोंद झाली. २६ बाधितांनी कोरोनावर मात केली. शनिवारी आढळलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक ३७ रुग्ण गोंदिया तालुक्यातील आहेत. गोरेगाव २, तिराेडा ३, आमगाव ४, सालेकसा २, देवरी २, सडक अर्जुनी १ आणि बाहेरील राज्यातील २ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे गोंदिया आणि आमगाव तालुक्यात आहेत. मात्र, गोंदिया तालुक्यातील कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांचा आकडा दोन आकडी पार झाल्याने चिंता वाढली आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत ९३,५९८ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. यापैकी ७९,६५५ जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली जात आहे. ७९,६२५ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले होते. त्यापैकी ७३,२५९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १४,९९५ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी १४,४१८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्य:स्थितीत ३९० कोरोना ॲक्टिव्ह रुग्ण असून १,४८८ स्वॅब नमुन्यांचा अहवाल अद्याप गोंदिया येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.
........
रुग्णांचा पाझिटिव्हिटी रेट ८.९ टक्के
कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात दररोज २,३०० कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. त्यात ५० ते ५५ कोरोनाबाधित आढळत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचा पाझिटिव्हिटी रेट ८.९ टक्के आहे. रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने जिल्हावासीयांची चिंता वाढली आहे.
......