गोंदिया : महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील मागील दहा पंधरा दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे याचा प्रवासी वाहतुकीवर सुध्दा काही प्रमाणात परिणाम झाला आहे. मात्र रेल्वे गाड्यांमध्ये वेटींग कायम असल्याचे चित्र आहे. आझाद हिंद एक्सप्रेस, गीताजंली, हावडा-मुंबई मेल, जनशताब्दी, महाराष्ट्र एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये शंभर दीडशेपर्यंत वेटींग लिस्ट आहे. सर्वाधिक वेटींग ही मुंबई-हावडा मार्गावरील गाड्यांमध्ये आहे. रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत काही गाड्यांमध्ये वेटींगची स्थिती राहण्याची शक्यता आहे. मागील वर्षीपासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव असून रेल्वेची प्रवासी वाहतूक अद्यापही पूर्णपणे रुळावर आलेली नाही तर कोरोना संसर्गात पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली असल्याने मे आणि जून महिन्यादरम्यान रेल्वे गाड्यांमध्ये फारसे वेटींग नसल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. गोंदिया रेल्वे स्थानकावरुन सद्यस्थितीत आठवड्यातून २२० रेल्वे गाड्या धावत आहेत.
.........
परीक्षेनंतरही नो हाऊसफुल
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल ते मे महिन्या दरम्यान होणार आहेत. जून महिन्याच्या अखेरीस परीक्षा संपणार आहेत. यानंतर बहुतेक जण बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखतात. त्यामुळे परीक्षेनंतर रेल्वे गाड्यांमध्ये वेटींग लिस्ट भरपूर असते. पण यंदा कोरोनामुळे रेल्वे गाड्यांमध्ये फारशी वेटींग नसल्याचे चित्र आहे.
...............
दररोज धावतात ४२ रेल्वे गाड्या
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया हे एक प्रमुख स्थानक आहे. लॉकडाऊनपूर्वी या रेल्वे स्थानकावरुन दररोज ७५ हून अधिक रेल्वे गाड्या धावत होत्या. तर सद्यस्थितीत या रेल्वे स्थानकावरुन ४२ गाड्या धावत आहे. गाेंदियावरुन सुटणाऱ्या गाड्यांमध्ये सध्या तरी वेटींग नसल्याने प्रवाशांना त्रास होत नसल्याचे चित्र आहे. आझाद हिंद एक्सप्रेस, मेल, गीतांजली, जनशताब्दी, हावडा-पुणे, हावडा-मुंबई याच रेल्वे गाड्यांमध्ये सद्यस्थितीत अधिक वेटींग आहे.
............
हावडासाठी वेटींग, पुणेसाठी नो वेटींग
कोरोनाचा संसर्ग सुरु असला तरी प्रवासी सुरक्षित प्रवासासाठी रेल्वेलाच महत्व देत असल्याचे चित्र आहे. कोलकाता, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथील कामगार मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे येथे रोजगारासाठी जातात. होळी सणानिमित्त सध्या ते गावाकडे परतत आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी वाढत आहे.
........
कोट :
गोंदिया रेल्वे स्थानकावरुन दररोज सद्यस्थितीत ४२ रेल्वे गाड्या धावत आहे. यापैकी गाड्यांमध्ये सध्या वेटींग आहे. तर काही गाड्यांमध्ये आरक्षण तिकीट सहज उपलब्ध होत आहे. होळी दरम्यान गाड्यांमध्ये वेटींग वाढण्याची शक्यता आहे.
-जनसंपर्क अधिकारी रेल्वे.