गोंदिया : हृदयरूग्ण असलेल्या आपल्या मुलामुलीला शिक्षण देण्यासाठी एक महिला आपल्या पतीसह मागील १६ वर्षांपासून शहर व ग्रामीण भागात भिंतीवर पेंटिंग करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते. हा निश्चितच कौतुकाचा विषय आहे. कमला योगेश बावणे (४५) व योगेश बावणे रा. दवनीवाडा असे त्या दाम्पत्याचे नाव आहे. त्यांना ज्योती (१६) व कृष्ण (१४) अशी अपत्ये असून ते हृदयरूग्ण आहेत. मुलांचे शिक्षण व पालनपोषण करीत असताना दोन्ही बालकांना महागडी औषधी लागतात. गरिबीमुळे आई-वडील औषधीचा खर्च उचलू शकत नाही. त्यामुळे लहान मुलगा हृदयरूग्ण असतानाही शाळा सोडून आई-वडिलांसह पेंटींगचे काम करून औषधीयोग्य पैसे कमावतो. तसेच परीक्षेच्या वेळी परीक्षासुद्धा देतो. बावणे कुटुंबीय मागील १० वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात दवनीवाडा येथील घर सोडून गावागावात, शहराशहरात भटकंती करीत आहेत. कुठेही हातांना काम मिळेल, उदरनिर्वाहाची सुविधा होईल, मुलांचा औषधोपचारही करता येईल, यासाठी ते भटकत आहेत. असे असतानाही कमला बावणे यांनी आत्मविश्वास सोडला नाही. गोंदियात एका कार्यक्रमात सुजित बोरकर, रंजित शहारे, कैलाश नंदेश्वर आदी माताटोली गोंदिया येथील नागरिकांनी त्यांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)
भिंती रंगवून दोन रूग्ण मुलांना सांभाळते आई
By admin | Published: March 16, 2017 12:29 AM