लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आई मुलाला सृष्टीत आणण्याचे काम करते. परंतु जगात जगण्याची आणि आकलन करण्याची दृष्टी शिक्षक देतो. शिक्षक कुणीही होऊ शकत नाही, अपवादात्मक परिस्थितीचे आत्मपरीक्षण करणाराच शिक्षक होतो. शिक्षक व्यवसाय नव्हे तर ती सेवा असून शिक्षण देणे हे व्रत म्हणून स्वीकारतात, म्हणून ते जीवन समृद्ध करणारे आहेत. आजुबाजुच्या व्यक्तींना जगण्याचा मार्ग दाखविणारा व्यक्ती शिक्षकच जीवनाला रंग देऊ शकतो, असे प्रतिपादन आठव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष व नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाचे संचालक वामन केंद्रे यांनी येथे केले.शिक्षक भारतीतर्फे आठव्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाचे आयोजन स्थानिक नमाद महाविद्यालयाच्या सभागृहात रविवारी (दि.२३) करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. या वेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरद पवार, खा.प्रफुल्ल पटेल, खा.मधुकर कुकडे, आ.कपिल पाटील, आ.प्रकाश गजभिये, माजी मंत्री नाना पंचबुध्दे, अनिल देशमुख माजी आ. राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, स्वागताध्यक्ष राजेंद्र झाडे, प्रभा गणोरकर, विश्वस्त अशोक बेलसरे, प्रसिध्द कवी नीरजा, अतुल देशमुख, लोककवी अरुण म्हात्रे, जयवंत पाटील, स्वागताध्यक्ष राजेंद्र झाडे, प्राचार्य रजनी चौबे उपस्थित होते. खा. प्रफुल्ल पटेल यांनी घंटानाद करून संमेलनाचे उदघाटन झाल्याचे जाहिर केले.केंद्रे म्हणाले, कपिल पाटील व पटेल हे ध्येयाच्या मागे धावणारे आहेत. देशात शिक्षकांचे साहित्य संमेलन भरविणारे एकमेव व्यक्ती पाटील हे आहेत. शिक्षक हा समाज रचनेतील महत्वाचा घटकच नव्हे तर कारागिर आहे. शिक्षक व शिक्षण पध्दतीवर निर्माण व्हायला पाहिजे. नोकरी टिकवायची या पातळीवर जो येतो ते योग्य नाही. उलट त्याच्याकडील ऊर्जा वापरून त्याचा समाजाच्या समृध्दीसाठी वापर व्हायला पाहिजे. दुभंगलेला समाजाला जोडण्याचे काम शिक्षकांनी करावे. शिक्षक हा केवळ चार भिंतीत सापडत नाही कुठेही सापडतो तो खरा शिक्षक होय. ज्या देशाची शिक्षण आणि संस्कृती सगळ्यात समृध्द असेल तो देश नक्कीच सुपर पॉवर होईल. तसेच शिक्षणावरील बजेटमध्ये वाढ होण्याची गरज आहे.पटेल म्हणाले, शिक्षणाचे महत्व मोठे असून काळ झपाट्याने बदलत चालले आहे. त्यानुसार आपल्यालाही शिक्षणात बदल करावे लागणार आहे. आज जग एकमेकांशी एवढे जवळ आहे की मुंबईत काय घडते हे क्षणार्धात कळते. आम्ही झाडीपट्टीतीलच आहोत. आमची संस्कृती वेगळी आहे. आपल्या मूळ संस्कृतीला विसरता कामा नये यासाठी शिक्षकांचे समेलन घेण्याचे महत्वाचे कार्य शिक्षक भारती करीत आहे. पवार साहेब देशातील जाणते राजे असून वेळ आणि शिस्त पाळणारे असे नेते या संमेलनाला आल्याने वेगळे महत्त्व आल्याचे सांगितले. कपिल पाटिल म्हणाले साहित्य अध्यापनाचे कार्य वाढावे शिक्षकांमध्ये पुरोगामी विचार निर्माण करण्यासाठी होत आहे. हे अधिवेशन पटेलांच्या प्रयत्नामुळे हे राज्यस्तरीय ठरले असून शरद पवारांचा साहित्य व संस्कृतीत मोठा वाटा आहे. महाराष्ट्र सरकारने इतिहास बदलला, साहित्य बदलले आता इतिहास बालभारतीत नव्हे तर रामभाऊ म्हाळगीत लिहिले जात असून चुकीचा इतिहास पाठ्यक्रमात दिला जात असल्याचे सांगितले.पवार म्हणाले पिढी घडविण्याचे काम शिक्षक सातत्याने करीत असतो. त्यात शिक्षक म्हणून साहित्याच्या क्षेत्रात काम करताय हे खरे समाजकार्य होय. गाडगे महाराज नेहमी सांगायचे दगडाला नमस्कार करू नका काहीही होणार नाही, शिक्षण घ्या विचार करा हा संदेश ते द्यायचे त्याच विचारची आजही गरज आहे.समाजाचा विरोध असताना शिक्षण घेण्याच्या व शिकवण्याचा व्रत घेणाऱ्या सावित्रीबाई या आमच्या खºया प्रेरणास्थान असायला पाहिजे, साहित्याच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिलेले आहे. साने गुरूजींनी सोप्या भाषेत कसे लिहायचे हे सांगितले. मराठी साहित्यात आचार्य अत्रेंचे योगदान विसरता येणारे नाही ते ही आदर्श शिक्षक होते. आज तर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात असल्याने लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे शिक्षकांनी विज्ञान आणि संस्कृतीवर आधारीत ज्ञान दानाचे कार्य करुन आदर्श पिढी तयार करण्याचे आवाहन केले. या वेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शिक्षक साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. राज्यभरातील शिक्षक सहभागी झाले.शिक्षक नेहमीच आदरणीयजे.पी.नाईक व चित्रा नाईक हे शिक्षक माझ्यासाठी विशेष आहे. मी शिक्षणमंत्री होतो तेव्हा चित्रा नाईक शिक्षण संचालक होत्या मंत्री म्हणून कधी त्यांच्यासमोर बसलो नाही तर आपल्या शिक्षक समजून त्यांच्यासमोर बसून माहिती घेत होतो.त्यामुळे शिक्षक नेहमीच आपल्यासाठी आदरणीय असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
आई बाळाला सृष्टी देते पण शिक्षक दृष्टी देतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2018 9:28 PM
आई मुलाला सृष्टीत आणण्याचे काम करते. परंतु जगात जगण्याची आणि आकलन करण्याची दृष्टी शिक्षक देतो. शिक्षक कुणीही होऊ शकत नाही, अपवादात्मक परिस्थितीचे आत्मपरीक्षण करणाराच शिक्षक होतो.
ठळक मुद्देवामन केंद्रे : आठवे राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन, राज्यभरातील शिक्षकांची उपस्थिती