संतोष बुकावन
लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : सहा महिन्यांपूर्वी आई गेली. आईच्या मृत्यूचे दुःख पचवून बाप आईची माया देत होता. पण नियतीला ते मान्य नव्हते. या कुटुंबाला कुणाची दृष्ट लागली कुणास ठावूक. महिनाभरापूर्वी कोरोनाने त्यालाही हिरावून घेतले. अगदी खेळण्या- बागडण्याच्या वयात त्या कोवळ्या लेकरांवर संसाराची धुरा सांभाळण्याची वेळ येऊन ठेपली. शेवटी आई गेली, बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला... असे म्हणण्याची वेळ त्या चिमुकल्या बहिणींवर आली.
मोठी सलोनी पंधरा वर्षांची, प्रतीक्षा बारा वर्षांची, तर प्रियांशू अवघ्या अडीच वर्षांचा. तिघांच्याही वाट्याला अनाथाचं जगणं आलं. पोटाला चिमटा देत लेकींना घडवायचं. आपल्या नशिबी आलेलं दारिद्र्य त्यांच्या वाट्याला येऊ नये यासाठी त्यांना शिकवून पायावर उभं करायचं त्याचं स्वप्न होतं. दोन्ही लेकींना गावातीलच एका नामांकित शाळेत टाकलं. हे स्वप्न पडत असतानाच ते क्षणात विखुरतील, अशी कल्पना आप्तेष्टांनीही केली नव्हती. पण अखेर नियतीसमोर कुणाचंच चालेना. क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं.
अर्जुनी मोरगाव येथे एका टपरीत रामदास कोलते याचे दुचाकी दुरुस्तीचे दुकान होते. दुचाकी दुरुस्तीवर तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा. पत्नीच्या हृदयाचे व्हॉल्व निकामी झाले. शस्त्रक्रिया केली. ५ डिसेंबर २०२० ला तिने अखेरचा श्वास घेतला. तिच्या उपचारासाठी बराच पैसा खर्च झाला. या धक्क्यातून सावरत असतानाच कोरोना आला. रामदासला कोरोनाची लागण झाली. त्याला स्थानिक कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले. येथून ब्रम्हपुरीच्या ख्रिस्तानंद खासगी रुग्णालयात हलविले. पण कोरोनातून सुटका झाली नाही. नागपूरच्या एका खासगी रुग्णालयात नेले. अखेर २७ मे रोजी रामदासचीही प्राणज्योत मालवली.
रामदाससाठी बराच खर्च करावा लागला. त्या तिघांचे आधारवडच निघून गेले. सहा महिन्यांच्या आत जन्मदात्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या मनावर मोठा आघात झाला. त्यांच्या पालनपोषणासाठी म्हातारे आजी-आजोबा धावून आले. अडीच वर्षाच्या प्रियांशूला कळत नाही, पण सलोनी व प्रतीक्षा यांना जबर धक्का बसला आहे. रामदासच्या उपचारासाठी वृद्ध आई-वडिलांनीच खर्च केला. ते कर्जबाजारी झाले. रामदासच्या वडिलांची पाच एकर शेती आहे. यात म्हातारे व तीन भावंडांच्या कुटुंबाची जबाबदारी पेलण्याचे मोठे आव्हान या वृद्धांवर आहे. त्या भावंडांना शासनाने आर्थिक मदत करावी, अशी अपेक्षा वृद्ध आजोबांनी सदर प्रतिनिधीजवळ व्यक्त केली.
बँकेतील पैसे देण्यास नकार
रामदासची तिन्ही मुलं अवयस्क आहेत. यापुढे आजोबाच त्यांचं पालनपोषण करणार आहेत. रामदासने काटकसर करून बँकेत काही पैसे जमा केले. पण वारसदार अवयस्क असल्याने बँकेने पैसे देण्यास नकार दिला. कोरोना उपचारासाठी म्हाताऱ्या वडिलांचेही बरेच पैसे गेले. आता या तिघांच्या पालनपोषणाची जबाबदारी आली. पुढे कसे करायचे, हे त्यांना सुचेनासे झाले आहे. तसेच त्या तीन भावंडांना, आई गेली-बाप गेला, आता सांभाळी विठ्ठला... असे म्हणण्याची वेळ आली.