गोंदिया : जल, जंगल, प्राणी, पशू, पक्षी व खनिज पर्यावरणाच्या या घटकांसह भारतभूमीवर निवास करणाऱ्या मानवजातीचा समावेश भारतमातेत होतो. आजच्या काळात मानवाला निरोगी व समृद्ध आरोग्य हवे असेल तर पर्यावरण वाचविण्याशिवाय पर्याय नाही. पर्यावरण वाचले तरच भारतमाता वाचेल, असा सूर जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन विद्यार्थी संवादात सहभागींनी व्यक्त केला.
गोंदिया शिक्षण संस्था द्वारा संचलित नटवरलाल माणिकलाल दलाल महाविद्यालयातील पदव्युत्तर राज्यशास्त्र विभागाच्या वतीने प्राचार्य डाॅ. शारदा महाजन यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात ‘हमारी उम्मीद - हमारा संकल्प’नुसार पर्यावरणाला कसे वाचवायचे या विषयावर ऑनलाईन विद्यार्थी संवाद आयोजित करण्यात आला होता. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी डाॅ. एच. पी. पारधी होते.
याप्रसंगी प्राचार्य डाॅ. महाजन, डाॅ. किशोर वासनिक, डाॅ. शशिकांत चौरे व प्रा. घनशाम गेडेकर उपस्थित होते. ऑनलाईन विद्यार्थी संवादात अमित गोपलानी, गौरी भेलावे, आलिया शेख, अंजली धुर्वे, विश्वनाथ उके, तृप्ती बिरोले सहभागी झाले होते. गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना या महामारीने ऑक्सिजन अर्थात पर्यावरणाची निकड किती महत्त्वाची आहे, हे दाखवून दिले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेक नागरिकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले. भारतात जल व जंगलाला अर्थात पर्यावरणाला वाचविण्याचे कार्य आदिवासी बांधवांनी केले आहे.
पर्यावरण वाचविण्यासाठी १९७२ साली स्वीडन येथील स्टाॅकहोम येथे एक परिषद झाली. या परिषदेत ५० पेक्षा अधिक राष्ट्रे सहभागी झाली. त्या परिषदेत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जागतिक मंचावर पर्यावरण वाचविण्याची गरज बोलून दाखविली आणि त्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले. पर्यावरणाविषयी जागृती करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ५ जून रोजी ‘पर्यावरण दिवस’ साजरा करण्यात येत आहे. हा दिवस साजरा करण्यासोबतच प्रत्यक्ष कार्य करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन विद्यार्थी संवादात करण्यात आले. नेहा यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.
......
प्रत्येकाने एक दिवस पर्यावरणासाठी द्यावा
पर्यावरण ही सगळ्यांची गरज आहे. त्यामुळे पर्यावरण वाचविण्याची जबाबदारी सर्वांची आहे. प्रत्येकाने आठवड्यातून किमान एक दिवस तरी पर्यावरणाच्या कामासाठी देण्याची गरज आहे. पर्यावरण वाचविण्याची सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. सर्वांच्या सहकार्यातून पर्यावरण वाचेल आणि सगळ्यांना निरोगी आयुष्य जगायला मिळेल; अन्यथा येणाऱ्या काळात प्रत्येकाला खांद्यावर ऑक्सिजन सिलिंडर घेऊन जीवन जगावे लागेल. ही वेळ येऊ नये यासाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन करावे, असे आवाहन सहभागी विद्यार्थ्यांनी केले.