देवानंद शहारे ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हृदयरोग असलेल्या मुलामुलीच्या उपचारासाठी व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ग्राम दवनीवाडा येथील कमला योगेश बावणे या शहर व गावोगावी फिरून भिंती रंगविण्याचे काम करीत आहे. तिचे पतीसुद्धा भिंती रंगविण्याच्या कामातून अर्थार्जन करून तिला मदत करीत आहेत.बेरोजगारीवर मात करुन पती योगेशच्या हातातील कला पत्नी कमलाने आत्मसात केली. मागील १६ वर्षांपासून गावोगावी फिरून हे दाम्पत्य पोटाची खळगी भरत आहे. त्यांना १६ वर्षीय मुलगी व १४ वर्षीय मुलगा अशी दोन मुले असून त्यांना हृदयविकार आहे. लाखो रूपये खर्चूनही त्यांच्यावर योग्य उपचार झाले नाही. त्यांना महागडी औषधी लागते. मोठ्या व चांगल्या डॉक्टरकडे नेण्यास त्यांच्याकडे पुरेस पैसे नाहीत. त्यामुळे त्यांचे पालन पोषण, शिक्षण व औषधोपचारासाठी गावातील लहानमोठी मजुरीचे कामे सोडून मोठ्या शहरात काम करावे लागत आहे. कमला व योगेश खांद्याला खांदा लावून पेंटिंगच्या कामातून अर्थार्जन करीत आहेत. पेंटिंगच्या माध्यमातून त्यांना ३०० ते ४०० रूपये दररोज मिळतात. त्यातून मुलांचा औषधोपचार, घरखर्च करतात. तेवढ्यानेही भागत नसल्याने हृदयरोग असलेला लहान मुलगा शाळा सोडून आई-वडिलांसह भिंती रंगविण्याच्या कामावर जातो. बावणे कुटुंबीय मागील १० वर्षांपासून रोजगाराच्या शोधात आपले दवनीवाडा येथील मूळ अधिवास सोडून भटकत आहेत. पती योगेश ब्लॅक बेल्ट विजेते असतानाही बेरोजगारीमुळे त्यांचे कुटुंब वाऱ्यावर होते. मात्र त्यांच्याच पेंटिंगच्या कलेमुळे पत्नी कमलाच्या आशा पल्लवित झाल्या. त्यातूनच तिचा आत्मविश्वास वाढून तिने पतीसह भिंती रंगविण्याचे काम करून त्या आपल्या दोन्ही मुलांना नवजीवन देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मुलांच्या उपचारासाठी गोंदियात ‘आई’ रंगविते भिंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2018 1:30 PM