विजय मानकर
सालेकसा : मुंडीपार येथील मोहारे कुटुंबावर संकटाचे आभाळ असे कोसळले की, यातून सावरण्याचे मार्ग बंद झाले. त्यातच दोन बहिणींचा आधार हिरावला आणि वाट्याला आला केवळ अंधार. त्यातच अर्धांगवायूग्रस्त पित्याचा जबाबदारी सांभाळण्याची वेळ दोन बहिणीच्या खांद्यावर आली आहे. हसण्या-खेळण्याच्या वयात त्यांना कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्याची वेळ आली आहे.
दिलीप पन्नालाल मोहारे यांना दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला. शेतातील कीटकनाशक औषधीचा त्यांच्या अंगावर दुष्परिणाम झाल्याने त्यांना कायमचे अपंगत्व आले. उपचारानंतरही ते यातून बरे झाले नाही. त्यामुळे त्यांना पत्नी सतवंती मोहारे हिच्या आधारावर जगावे लागत होते. भूमिहिन शेतमजूर असलेल्या सतवंतीने आपल्या अपंग पतीसह दोन मुली आणि एका मुलाच्या शिक्षणाची जबाबदारी सांभाळत कुटुंबाचा गाडा पुढे नेण्याचे काम करीत होती. संघर्षमय जीवन जगत असले, तरी पती-पत्नी आणि तिघे भावंड मिळून एकमेकांवर प्रेम करीत जीवन जगत होते. यंदा दिलीप मोहारे यांच्या नावाने प्रधानमंत्री आवास योजनेचे घरकूल मंजूर झाले. त्यांनी आपले जुने मातीचे घर तोडून घरकूल बांधकामाला सुरुवात केली. दरम्यान, स्वयंपाक खोली जशीच्या तशी ठेवून त्या खोलीतच राहणे, खाणे आणि झोपणे असा नित्य क्रम सुरू केला. खाटेची समस्या असल्याने ते पाचही जण जमिनीवर झोपत होते, परंतु १३ जूनची रात्री मोहारे कुटुंबासाठी काळरात्र ठरली. एका दांडेकार प्रजातीच्या सापाने सर्वप्रथम कोपऱ्यात असलेल्या कोंबडीला चावा घेतला. कोंबडीच्या त्याचवेळी मृत्यू झाला. भिंतीच्या जवळून जात असताना प्रथम वडील झोपले असता, त्याला काही न करता, जवळच्या अकरा वर्षांचा मुलगा दीपकच्या कानाजवळ चावा घेतला. त्यानंतर, दोन बहिणी झोपले असता, त्यांनाही काही करता, आई-सतवंतीच्या हाताला चावा घेतला. दोघे खळबळून जागे झाले. तेव्हा दांडेकार सापाने दंश केल्याचे लक्षात आले. शेजारी धावून आले. त्यांनी सापाला मारले, तसेच दीपक आणि सतवंती या दोघ्या मायलेकांना सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक औषधोपचार करीत सर्पदंशाची औषधही देण्यात आली. लगेच गोंदियाला पाठविण्याची व्यवस्था केली. सापाचे विष मेंदूपर्यंत गेल्याने मुलाचा वाटेतच मृत्यू झाला, तर आई सतवंती हिचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. एकीकडे कुटुंबाच्या आधार असलेल्या आई तर सोबतच वंशाचा दिवा असलेला एकुलता मुलगा दीपक या दोघांचा करून अंत झाला.
..........
दोन बहिणीच्या शिक्षणाचा प्रश्न
आई आणि लहान भावाच्या मृत्यूनंतर गायत्री आणि दिव्या या दोन बहिणी अनाथ झाल्या. त्यांच्यावर अर्धांगवायूग्रस्त राहणाऱ्या वडिलांची जबाबदारी आली. सतवंती जीवित असताना, पत्नी म्हणून दिलीप मोहारे याला दररोज आंघोळ करून देणे, शौचास नेणे, जेवण करवून देणे ही सगळी जबाबदारी पार पाडायची, परंतु आता त्याची सेवा कोण करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठी बहीण गायत्री १८ वर्षांची असून १२वी मध्ये शिकत होती, तर लहान बहीण दिव्या १२ वर्षांची आहे. ती सहावीत शिकत होती. या दोन बहिणींच्या शिक्षणाचा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
बॉक्स....
‘लोकमत’च्या प्रयत्नांना यश
मोहारे कुटुंबावर संकटाचे आभाळ कोसळल्याचे माहीत होताच, लोकमत चमूने मुंडीपार या गावी त्यांच्या घरी जाऊन अनाथ झालेल्या मुलींना सांत्वना केली. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार व इतर अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देऊन, शासन स्तरावर आवश्यक ती मदत करण्याची विनंती केली. तहसीलदार शरद कांबळे, नायब तहसीलदार अरुण भुरे यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी पीडित कुटुंबाला लगेच भेट दिली. दर महिन्याला मोफत अन्नधान्य व निराधार योजनेंतर्गत शासनाची पेन्शन योजना तत्काळ सुरू करण्याची ग्वाही लोकमत प्रतिनिधींच्या समोर दिली.