गोंदिया : शेतातील मोटरपंप चोरी करून त्यांचा गोरखधंदा करणाऱ्या तीन आरोपींकडून पाच सबमर्सिबल मोटरपंप जप्त करण्यात आले आहे. शहर पोलिसांनी शनिवारी (दि.२९) ही कारवाई केली आहे.
शहर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ग्राम पिंडकेपारच्या स्कूलटोली येथील अमित अरुण ठाकरे (वय २२) यांच्या शेतातील सबमर्सिबल मोटरपंप चोरट्यांनी बुधवारी (दि.२६) रात्री चोरून नेला होता. या संदर्भात शहर पोलिसांत भादंवि कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा तपास करीत असताना गुप्त माहितीच्या आधारे शुभम नरेंद्र मेश्राम (२४), नीतेश जियालाल देशमुख (३०) व विलास संजय टेंभेकर (२८, तिन्ही रा. गौतमनगर, बाजपेयी वाॅर्ड) यांना ताब्यात घेऊन शनिवारी (दि. २९) अटक केली. त्यांनी ५७ हजार रुपये किमतीचे ५ मोटरपंप चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली असून पोलिसांनी ते पंप ताब्यात घेतले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश बनसोडे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित भुजबळ, संतोष सपाटे, पोलीस नायक जागेश्वर उईके, ओमेश्वर मेश्राम, सुबोधकुमार बिसेन, संतोष बोपचे, प्रमोद चव्हाण, योगेश बिसेन, दीपक रहांगडाले, पोलीस शिपाई छगन विठ्ठले, विकास वेदक, शहारे यांनी केली आहे.