बोंडगावदेवी : तालुक्याच्या बरडटोली येथील घरासमोर ठेवलेली मोटारसायकल शनिवारी (दि. ५) कुणीतरी चोरून नेली. रविवारी (दि. ६) चोरीची तक्रार केली. पोलिसांनी गुन्ह्याचा तपास हाती घेतला. तपासाची शोधमोहीम सुरू करून अवघ्या एकाच दिवसात अर्जुनी-मोरगाव पोलिसांनी मोठ्या शिताफीने दोघा चोरांच्या मुसक्या आवळल्या.
मोटारसायकल चोरीच्या आरोपावरून दोघांना गजाआड केल्याने चोरीचे इतर गुन्हे उघडकीस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अरततोंडी येथील लीलानंद तरोणे अर्जुनी-मोरगावच्या बरडटोली परिसरातील कावळे यांच्या घरी स्टाइल लावण्याचे काम करीत होते. सीडी डॉन, एमएच-३५ एक्स-२६९० या क्रमांकाची मोटारसायकल शनिवारी घरासमोर ठेवली होती. सायंकाळी कोणा तरी अज्ञात इसमाने नेल्याचे दिसून आले. आजूबाजूला शोध घेतला असता मोटारसायकलचा ठावठिकाणा लागला नाही. दुसऱ्या दिवशी रविवारी (दि. ६) लीलानंद तरोणे यांनी पोलीस स्टेशनला मोटारसायकल चोरी झाल्याची तक्रार नोंदविली. याप्रकरणी कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा नोंदवून तपास हाती घेण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार यशवंत मडावी, पोलीस नायक रोशन गोंडाणे, पोलीस शिपाई मोहन कुहीकर यांनी तपासाची गती वाढवून शोधमोहीम सुरू केली. अखेर २४ तासांच्या आत बरडटोली येथील पवन परसराम नेवारे (२३) आणि महागाव येथील जब्बार रफिक शेख (२८) या दोन युवकांना ताब्यात घेऊन चोरीस गेलेली मोटारसायकल त्यांच्याकडून हस्तगत करण्यास पोलिसांना यश आले. या दोन्ही आरोपींचा पीसीआर घेऊन चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याचा कयास लावला जात आहे. पोलीस निरीक्षक महादेव तोंदले यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास यशवंत मडावी, रोशन गोंडाणे, कुहीकर करीत आहेत.