गोंदिया : शहर व जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या मोटारसायकल चोरट्यांवर पोलिसांची करडी नजर होती. अशातच गोंदिया शहर व स्थानिक गुन्हे शाखेने प्रशांत कन्हैयालाल कोहळे (३२, रा. एमआयडीसी, मुंडीपार) व निशांत ऊर्फ विक्की सुनील खरोले (२४, रा. सेजगाव खुर्द) यांना अटक करून त्यांच्याकडून १२ मोटारसायकली जप्त केल्या. या दोघांना न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२६) पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रशांत कोहळे याच्याजवळ चोरीची मोटारसायकल असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याला विचारपूस केल्यावर त्याने निशांत खरोले याच्यासोबत येथील बाई गंगाबाई रुग्णालयाच्या मागील भागातून त्याच्याकडे असलेली मोटारसायकल चोरल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी गुरुवारी (दि.२२) निशांत आणि प्रशांतला ताब्यात घेऊन त्या दोघांकडून १२ मोटारसायकली जप्त केल्या. तसेच त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२६) पोलीस कोठडी सुनावली आहे. आता चौकशीत आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.