गोंदिया : आदिवासी बिंझवार-इंझवार समाज हा एकच असून त्यांना जात प्रमाणपत्र देण्यात यावे, तसेच एसटीच्या सवलतींचा लाभ द्यावा या मागणीसाठी प्रहार संघटनेसह आदिवासी बिंझवार (इंझवार) समाज समितीच्या वतीने सोमवारी धरणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलसन करण्यात आले. मात्र यादरम्यान एका कार्यकर्त्याने घरी जाऊन विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांनी त्याचा मृतदेह धरणे आंदोलनाच्या मंडपात ठेवून आंदोलन सुरूच ठेवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.रमेश नामदेव डोंगरवार, रा.गोवर्धन चौक, छोटा गोंदिया असे त्या मृतकाचे नाव आहे. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सदर धरणे आंदोलन सुरू झाले. त्यात रमेशची पत्नी, आई सहभागी झालेले होते. रमेशही आंदोलनस्थळी आला होता असे सांगण्यात आले. मात्र काही वेळातच तो निघून गेला. तो थेट आपल्या छोटा गोंदियातील घरी गेला आणि समोर असलेल्या सरकारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. परिसरातील लोकांनी लगेच त्याला बाहेर काढले पण त्याचा जीव वाचू शकला नाही. दरम्यान आदिवासी बिंझवार (इंझवार) समाज समिती नागपूरचे सचिव अविनाश नेवारे यांच्या पुढाकाराने त्यांचा मृतदेह थेट धरणे मंडपात आणण्यात आला.काही वेळातच पोलीसही तिथे पोहोचले. पंचनामा आणि पोस्ट मार्टेम केल्याशिवाय मृतदेह इथे कसा आणला यावरून काही वेळासाठी पोलिसांनी दबाव टाकला. मात्र जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन निवेदन देईपर्यंत मृतदेह तेथून हलवू दिला नाही. या आंदोलनात प्रहारचे जिल्हाध्यक्ष प्रमोद गजभिये, शहराध्यक्ष पिंटू ठाकूर तसेच आदिवासी बिंझवार समाज समितीचे उपाध्यक्ष बी.बी.सोनवाने यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.मृत रमेश डोंगरवार हे मजुरीचे काम करीत होते. ते काही दिवसांपासून आजारीही राहात होते. त्यांची पत्नी लिटील फ्लॉवर शाळेत काम करते. (जिल्हा प्रतिनिधी)काय आहे आंदोलनकर्त्यांची मागणी?४राज्यात अनुसूचित जमातीच्या यादीत परिशिष्ट २ मध्ये आदिवासी बिंझवार जमातीचा समावेश आहे. या जमातीचे लोक मध्यप्रदेश व छत्तीसगड लगतच्या भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात राहतात. ते राहणीमानाप्रमाणे मराठी, हिंदी व छत्तीसगडी भाषा बोलतात. महाराष्ट्रातील बिंझवार जमातीचे लोक मराठी बोलत असल्याने भाषिक अपभ्रंशातून बिंझवारला इंझवार म्हणतात. राज्यात जातीच्या सर्व्हेप्रमाणे इंझवार जातीचा समावेश नाही. त्यामुळे इंझवार आणि बिंझवार हे एकच असून त्यांना अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी आहे. त्याबाबतचे शासकीय पुरावेसुद्धा सदर आंदोलनकर्त्यांनी दिले आहेत.
मृतदेह मंडपात ठेवून केले धरणे आंदोलन
By admin | Published: October 06, 2015 2:14 AM