लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शिक्षक बदली धोरणाच्या विरूद्ध महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सोमवार (दि.२२) दुपारी १.३० वाजता शिक्षण आयुक्त पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आहे. शिक्षक संघाच्या वतीने २७ फेब्रुवारी २०१७ च्या शिक्षक बदली धोरणाविरूद्ध आजपर्यंत अनेक प्रयत्न करण्यात आले. परंतु शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. काही ठिकाणी जिल्हा संघाच्या वतीने व राज्य संघाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. त्यांचा निर्णय शिक्षकांच्या बाजूने लागला तर उत्तमच होईल. पण निर्णय काय होईल, हे सांगणे शक्य नाही. राज्य संघाने औरंगाबाद उच्च न्यायालयात १५ मे रोजी याचिका दाखल केली. सुनावणी १९ मे रोजी होत आहे. त्यात २७ फेब्रुवारीच्या शासन निर्णयालासुद्धा स्थगिती मिळण्याची शक्यता आहे. तरीही जनमतासाठी सोमवारी, २२ मे रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शिक्षण आयुक्त पुणे यांच्या कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षक नेते संभाजीराव थोरात, प्रा.एस.डी. पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या नेतृत्वात मोर्चा निघणार आहे. मागण्यांमध्ये कोणत्याही प्रशासकीय कारणांवरून बदलीने तालुक्याबाहेर पदस्थापना देवू नये किंवा प्रशासकीय बदल्या तालुका केंद्रबिंदू ठेवूनच कराव्यात, आंतर जिल्हा बदली प्रक्रियेत जुने दाखल प्रस्ताव प्राधान्याने आॅफलाईन काढावेत, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करावी, संगणक प्रशिक्षणाला डिसेंबर २०१७ पर्यंत मुदतवाढ देवून मागील वसुली थांबवावी व सर्वच विषय शिक्षकांना पदविधर शिक्षकांची वेतन श्रेणी देण्यात यावी, यांचा समावेश आहे. सदर मोर्चात उपस्थित राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ गोंदियाचे जिल्हाध्यक्ष विरेंद्रकुमार कटरे, विभागीय अध्यक्ष नूतन बांगरे, जिल्हा सरचिटणीस अनिरूद्ध मेश्राम, कार्याध्यक्ष उमाशंकर पारधी, कोषाध्यक्ष सुधीर वाजपेयी, जिल्हा संपर्क प्रमुख नागसेन भालेराव, केदारनाथ गोटेफोडे, जिल्हा कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
बदली धोरणाविरूद्ध शिक्षक संघाचे आंदोलन
By admin | Published: May 20, 2017 2:01 AM