सालेकसा : ग्रामपंचायत कावराबांध अंतर्गत येणाऱ्या वार्ड- ४ गोवारीटोला येथे प्रवेश करतात चिखलाच्या साम्राज्य सुरू होते. त्यामुळे या गावातील लोकांना बाहेर निघण्यासाठी तसेच बाहेर गावावरून आलेल्या लोकांना गावात प्रवेश करण्यासाठी चिखलात खपल्याशिवाय दुसरा उपाय नाही. त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत.गावातील ही गंभीर समस्या मागील अनेक वर्षांपासून असूनसुध्दा स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे सतत दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे गोवारीटोला गावातील लोकांचे डोके तापले आहे. सालेकसा तालुक्यात सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीपैकी एक अशी ओळख असलेल्या कावराबांध ग्रामपंचायत एकूण पाच वार्डात विभाजीत असून यात पाच गावांचा समावेश आहे. यात वार्ड- ४ गोवारीटोला हे आमगाव-सालेकसा मुख्य मार्गावर असून या मार्गावर एक महत्वाचा चौक आहे. परंतु गोवारीटोला गावातील रस्ते नेहमी चिखलाने माखलेले असतात. या गावात म्हणायला तर सजग नागरिक, शिक्षीत व नोकरी करणारेही लोक आहेत. त्याचबरोबर तालुक्यावर आपली राजकीय पकड ठेवणारे लोकसुध्दा राहतात. त्यांना गावातील लोक नेहमी सहकार्य करीत असतात. परंतु सर्वांनी येथे आपल्या स्वार्थासाठीच अधिक राजकारण केल्याचे दिसून येते. येथील गावकरी लोकांच्या सार्वजनिक समस्यांशी त्यांना काहीही देणे-घेणे नाही, असेच दिसून येते. म्हणून गावात रस्त्याची समस्या अनेक वर्षांपासून कमी होण्याऐवजी वाढतच आहे. आज गावागावात प्रत्येक गल्लीत पक्के सिमेंटचे रस्ते झाल्याचे दिसत आहे. मात्र गोवारीटोला येथील रस्त्यांना पाहून असे वाटत की, आपण ५० वर्षांपूर्वीच्या भारतात राहत आहोत की काय? या गावातील काही लोक सुडाच्या भावनेने काम करीत असतात. निवडणुकीत पराभूत झाल्याने त्याचा राग काढत विकास कामासाठी आलेल्या निधीचा उपयोग इतर ठिकाणी करीत असून येथील ज्वलंत समस्येकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत. येथील रस्त्यांची दुर्दशा पाहून गावकरी लोक संतप्त झाले आहेत. तर बाहेरून येणाऱ्या लोकांना कीडस वाटते आणि स्थानिक प्रशासनाला तिरस्काराच्या नजरेने ते पाहतात. स्थानिक प्रशासन येथील रस्ते पक्के बनविण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. परंतु चिखलापासून लोकांना मुक्ती मिळावी, यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. (शहर प्रतिनिधी)
गोवारीटोल्यात चिखलाचे साम्राज्य
By admin | Published: September 13, 2014 2:01 AM