नवेगावबांध : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडच्यावतीने विविध कर आकारणी लावून सीएल मीटरधारक ग्राहकांचे आर्थिक शोषण करीत असल्याचा आरोप स्थानिक वीज ग्राहकांनी केला आहे. अव्वाच्या सव्वा कर आकारणी करून महावितरण कंपनी आर्थिक शोषण करीत आहे. स्थिर व इतर आकार कमी करून वीज ग्राहकांची आर्थिक लूट महावितरणने थांबवावी, अशी मागणी स्थानिक सीएल मीटरधारक वीज ग्राहकांनी केली आहे.
स्थिर आकार पूर्वी ३५० रुपये घ्यायचे तर आता ४०३ रुपये घेतले जात आहे. मीटरचे पैसे ग्राहक विद्युत जोडणी करतानाच देतो तरी पण दर महिन्याला मीटर भाडे आकारले जात आहे. बिल न भरल्यास विद्युत पुरवठा खंडित केल्यावर बिल भरल्यानंतर जोडणी चार्ज पूर्वी ६० रुपये होता. नंतर तो १०० रुपये झाला, आता ३५४ रुपये घेतले जात आहे. स्थिर, वहन, वीज शुल्क, वीज विक्री,व्याज अशा स्वरूपाची विविध आकारणी करून, महावितरण वीज ग्राहकांची लूट करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. स्थिर आकारासह इतर आकार कमी करून विद्युत देयके द्यावी, अशी मागणी स्थानिक ग्राहकांनी केली आहे.