चिखली : पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजारांवर आळा घालण्यासाठी पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येते. मात्र गावाला मागील ८ दिवसांपासून नळ योजनेद्वारे गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने शुद्ध पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागत आहे.
चिखली हे चार हजार लोकसंख्येचे गाव असून गावाला स्वतंत्र नळ योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दोन लाख लिटर क्षमतेची पाणी टाकी असून शशिकरण नदीवरुन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा होतो. ‘हर घर नल से जल’ अंतर्गत सार्वजनिक नळ बंद करुन घरोघरी नळजोडणी देण्यात आली आहे. मागील ५ वर्षांपूर्वी ऐन पावसाळ्याच्या दिवसात गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना शुध्द पाणीपुरवठा व्हावे म्हणून १४ व्या वित्त आयोगातून नवीन बोअरवेल खोदून शुद्ध पाणीपुरवठा केला जात होता. मात्र मागील ८ दहा दिवसांपूर्वी पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प झाल्याने जुन्याच यंत्रणेला कार्यान्वित करण्यात आले. परिणामी नदीतील पुराचे पाणी विहिरीत झिरपत असल्याने गढूळ पाणीपुरवठा होत आहे. यासाठी ग्रामपंचायतचा दुर्लक्षितपणा कारणीभूत असून आरोग्याच्या दृष्टीने त्वरित शुद्ध पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.