गोंदिया : मुंबई रेल्वे पोलीसमध्ये नोकरी लावून देण्याचे आमीष देऊन पाच जणांकडून ४७ लाख ३० हजार घेऊन त्यांची फसवणूक करण्यात आली. सालेकसा पोलिस ठाण्यांतर्गत घडलेल्या या घटनेत पोलिसांनी चौघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
सालेकसा तालुक्यातील ग्राम लटोरी येथील ओमबत्ती सुचितकुमार ढेकवार (४२) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी नंदकिशोर मूलचंद लिल्हारे (४०, रा. पांजरा-गोंदिया), जितेंद्र अशोक घरडे (४९, रा. प्रतिक इंटरप्राईजेस गोंदिया), शांती डालचंद मस्करे (४१, रा. झालीया) व मधू राऊत (रा. मरारटोली-गोंदिया) या चौघांनी २२ फेब्रुवारी २०२२ रोजी ओमबत्ती ढेकवार, जागेश्वर खेंदलाल दसरिया (४७, रा. ब्राह्मणटोला), चैनसिंग डोमनसिंग मच्छीरके (५०, रा. कावराबांध), भाऊलाल श्रावण शिवणकर (रा. सालेकसा) व चंद्रशेखर प्रदीप फुंडे (रा. सालेकसा) यांच्याकडून पोलीस भरतीच्या नावावर ४७ लाख ३० हजार रुपये घेतले.
पैसे घेऊनही नोकरी न मिळवून दिल्यामुळे या पाच जणांनी पैसे परत मागितले असता त्यांनी पैसे परत न देता खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. या घटने संदर्भात सालेकसा पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०,४६८,४७१,३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.१०.४० लाख रूपये केले परत
पैसे देऊनही नोकरी मिळत नसल्याचे बघून पैसे देणाऱ्या पाचही जणांनी आरोपींकडे पैशांसाठी तगादा लावला. यावर आरोपींनी अगोदर त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली. मात्र त्यांच्या धमकीला भीख न घालता पाचही जणांनी पैशांसाठी दबाव टाकला असता आरोपींनी ओमबत्ती व त्यांच्या भावाचे आठ लाख ५० हजार रुपये तर चंद्रशेखर फुंडे यांचे एक लाख ९० हजार रुपये असे एकूण १० लाख ४० हजार रुपये परत केले. मात्र उर्वरित ३६ लाख ९० हजार रुपये परत केले नाही.