कर्मचाऱ्यांची कॅशलेस ड्यूटी : मोहिमेचा अद्याप पत्ता नाही गोंदिया : जानेवारी महिना लोटत असतानाही पालिकेच्या कर वसुली मोहिमेला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याचे दिसत आहे. त्यात आता कर विभागातील कर्मचाऱ्यांची कॅशलेससाठी ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यामुळे ऐन कर वसुलीच्या काळात कर्मचारी आता कर वसुली करणार की कॅशलेससाठीची ड्यूटी करणार असा प्रश्न उद्भवत आहे. यात मात्र पालिकेची कर वसुली मोहीम बोंबलली असून यंदा काही खरे नाही असेच वाटत आहे. यंदा पालिकेला थकबाकी व चालू मागणी असे एकूण सात कोटी २० लाख रूपयांचे टार्गेट आहे. मार्च पर्यंत करण्यात आलेल्या कर वसुलीवरूनच पुढच्या वर्षीचे आर्थिक नियोजन करता येते. त्यासाठी दरवर्षी पालिकेच्या कर विभागाकडून जानेवारी महिन्यातच कर वसुली मोहीम सुरू केली जाते. यंदा मात्र कर वसुली मोहिमेचा दूरपर्यंत काही पत्ता दिसत नाही. जानेवारी महिना आता अंतिम टप्यात असून पुढच्या दोन महिन्यांत कर वसुलीचे हे टार्गेट सर करावे लागणार आहे. कर वसुलीचा हा मुख्य काळ असताना मात्र जिल्हा प्रशासनाकडून कर वसुली विभागातील २१ कर्मचाऱ्यांची कॅ शलेस मोहिमेत ड्यूटी लावण्यात आली आहे. याशिवाय कर वसुली मोहिमेत मदत करणाऱ्या कर मुल्यांकन विभागातील सुमारे सात कर्मचाऱ्यांचीही ड्यूटी लावण्यात आल्याची माहिती आहे. अशात आता या कर्मचाऱ्यांनी कर वसुली करायची की, कॅशलेस जनजागृतीच्या या मोहिमेत काम करायचे असा प्रश्न पडत आहे. पालिकेच्या निवडणुका जेमतेम आता उरकल्या. त्यातून कर्मचारी मुक्त होतात तोच आता कॅशलेससाठी त्यांची ड्यूटी लावण्यात आली आहे. त्यामुळे याचा परिणाम कर वसुलीवर पडणार यात शंका नाही. विशेष म्हणजे मागील वर्षीही पालिकेची कर वसुली ५० टक्केच्या आतच झाली होती. अशात यावर्षी मागील वर्षीची पोकळी भरून काढता आली असती. मात्र यंदाही तीच परिस्थिती दिसून येत आहे. अशात पालिकेची कर वसुली यंदाही ५० टक्के होणार काय यात शंकाच आहे. (शहर प्रतिनिधी) कर विभागातील कर्मचाऱ्यांची कॅशलेससाठी ड्यूटी लावण्यात आली असतानाच शौचालय सर्वेक्षणाचे काम त्यांना सोपविण्यात आले आहे. मात्र त्यांच्या वॉर्डातच त्यांना ही कामे करावयाची असल्याने कर वसुलीवर परिणाम पडू दिला जाणार नाही. २६ तारखे नंतर कर वसुलीची विशेष मोहिम सुरू केली जाणार आहे. - चंदन पाटील मुख्याधिकारी, नगर परिषद,गोंदिया नोटाबंदीचा मिळाला फायदा नगर परिषदेला पाच कोटी ५९ लाख रूपये मागील थकबाकीचे तर चार कोटी २६ लाख रूपये चालू वर्षातील मागणीचे असे एकूण नऊ कोटी ८५ लाख रूपयांचे टार्गेट होते. मात्र शासनाने मध्यंतरी १००० व ५०० रूपयांच्या नोटा चलनातून बाद केल्याने त्याचा चांगलाच फायदा नगर परिषदेला मिळाला. नोटबंदीतून नगर परिषदेला सुमारे एक कोटी २१ लाख रूपये कर भरणातून मिळाले. तर सोबतच डिसेंबर पर्यंतची कर वसुली असे एकूण दोन कोटी ६५ लाख रूपये मिळविले असून आता नगर परिषदेला सात कोटी २० लाख रूपयांचे टार्गेट सर करायचे आहे.
पालिकेची कर वसुली बोंबलली
By admin | Published: January 25, 2017 1:31 AM