गोंदिया : महाराष्ट्रातील महानगरपालिका, नगर परिषद व कटक मंडळ प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यात याव्यात म्हणून शिक्षक सहकार संघटना महाराष्ट्र राज्यच्या शिष्टमंडळाने आमदार परिणय फुके यांच्या नेतृत्वात नगर विकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांची भेट घेऊन चर्चा केली.
महाराष्ट्रात एकूण २७ महानगरपालिका व २२८ नगर परिषदा अ, ब आणि क वर्ग अशा तीन वर्गवारीत आहेत. कटक मंडळेसुद्धा आहेत. ज्यामध्ये शिक्षकांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्यासंदर्भात शिक्षक सहकार संघटना सतत पाठपुरावा करीत असते. आता शिक्षक सहकार संघटनेने महाराष्ट्राचे राज्यपाल, मुख्यमंत्री व नगर विकासमंत्री यांना निवेदन दिले. २००५ नंतर नियुक्त मनपा, न.प व कटक मंडळांमधील शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, अ तसेच ब वर्ग नगर परिषदा आणि महानगरपालिका शिक्षकांचे वेतन नगर विकास व शालेय शिक्षण विभागाकडून होत असल्यामुळे दरमहा वेतन उशिरा होते, त्यामुळे हे वेतन दोन विभागांकडून न होता शंभर टक्के वेतन शिक्षण व क्रीडा विभागाकडून प्रदान करणे, शिक्षकांना १०,२०, ३० सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लवकरात लवकर लागू करणे, नगर परिषद व महानगरपालिकेतील जीपीएफ खातेधारक शिक्षकांना शासकीय नियमाप्रमाणे व्याजदर मिळत नाही त्यांचे जीपीएफ खाते हे कोषागारमध्ये नसल्याने त्यांना व्याज बचत खाते मिळत नाही, शिक्षकांना जिल्हा परिषद शिक्षकांप्रमाणे सण अग्रिम मिळत नाही, ते देण्यात यावे, जिल्हा परिषदेप्रमाणे, नगर परिषद व महानगरपालिका शिक्षकांच्या ऑनलाइन बदल्या कराव्या, बदली झालेल्या शिक्षकांना सेवा ज्येष्ठतेचा लाभ देण्यात यावा, बदल्यांसाठी शिक्षण समितीची व सर्वसाधारण सभेच्या ठरावाची गरज असू नये. शिक्षण सेवकांचे मानधन मानधन सहा हजार रुपयांवरून २० हजार रुपये करण्यात यावे यासह अन्य मागण्यांचा समावेश होता. आ. परिणय फुके यांनी मागण्या रास्त असून त्या त्वरित सोडवाव्यात, असे प्रधान सचिव पाठक यांना सांगितले. शिष्टमंडळात संतोष पिट्टलवाड, विभागीय अध्यक्ष रविकुमार अंबुले, रवी ढगे, सुरेंद्र गौतम, लाखेश्वर लंजे यांचा समावेश होता.