गोंदिया : नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांना घेऊन गोंदिया नगरपालिका कर्मचारी संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले होते. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात १५ एप्रिल रोजी लेखणी बंद आंदोलन केले होते. मात्र, यानंतरही शासनाने त्यांच्या मागण्यांची दखल न घेतल्याने येत्या १ मेपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
कोरोनाकाळात सेवा देत असताना दोन नगर परिषद कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. शासनाने या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच मागील दोन तीन महिन्यांपासून नगर परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. नगर परिषदेतील रिक्त पदे अनुकंपा तत्त्वावर भरण्यात त्त्त, ७ व्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता देण्यात यावा यासह अन्य मागण्यांना घेऊन शासनाचे याकडे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. या आंदाेलनात कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र बन्सोड, उपाध्यक्ष नरेंद्र तिवारी, कार्याध्यक्ष दिलीप चाचीरे, महासचिव राजेश टेंभुर्णे, जितेंद्र वैष्णव, अजय चौरासीया, किशोर उके यांनी केले आहे.