गोंदिया : झाडीपट्टी रंगभूमी हीर कलावंताची फॅक्ट्री आहे. याच फॅक्ट्रीत अनुराग संजय पिल्लारे या १४ वर्षाच्या बाल कलाकाराने पदार्पण केले. सुरेख आवाज, अभिनयाची किमया यामुळे त्याने नाट्यप्रयोगांची शंभरी गाठून अवघ्या झाडीपट्टी रंगभूमीला भूरळ घातली. भजेपार येथील १९ व्या झाडीबोली साहित्य संमेलनातील चक्रव्यूह या नाटकातील त्याचा अभिनय आजही रसिकांच्या स्मरणात आहे. वडीलांचा इलेक्ट्रिक व्यवसाय, घरात अभिनयाची कसलीही पार्श्वभूमी नसताना इयत्ता दुसरीत अडाणी गंगुबाई नाटकात पिंट्याची भूमिका साकारली. गोरेगाव तालुक्यातील मुंडीपार येथील अनुराग अर्जुनी-मोरगाव येथील पंढरीबापू देशमुख विद्यालयाचा विद्यार्थी आहे. शिक्षक आणि स्थानिक नाट्यकलावंतानी त्यांच्यातील अभिनयाला दाद देण्याचे काम केले. ईश्वर धकाते, दिलीप लांजेवार, नंदू पोगळे, रमेश हातझाडे आणि वैनगंगा रंगभूमीचा यात सिंहाचा वाटा आहे. सुरेख आवाजात गाण्याची लय धरणाऱ्या या अनुरागचा तू आई माझी गं, लाडाची गुणाची ही गीत झाडीपट्टीच्या परिसरात गाजतोय. गायनात त्याला सद्या आसावरी तिडके यांची मदत मिळत असून कोरस शेंडे यांनी शिकवलं आहे. उद्धवस्त झालं घरट माझं. वनवा, मायलेकरु, माहेरवासीन, उपकार, खेळ हा उण सावल्यांचा, विनाश, विशुरले मोती संसाराचे, भाकर, कलंक, सुख आले माझ्या दारी, चक्रव्यूव्ह अशा प्रसिद्ध नाटकामधील अभिनयाची शंभरी अनुरागने गाठली आहे. रंगमंचावर अभिनय साकारणे फार अवघड काम आहे. भल्याभल्यांना या रंगमंचावर घाम फुटतो. मात्र अभिनयाची किमयाच ज्याच्या रोमारोमात असेल त्याला रंगमंचही छोटा वाटू लागतो. अशीच परिस्थिती अनुरागने निर्माण केली. वयाच्या ८ व्या वर्षातच नाटकात पदार्पण करुन आज १४ व्या वर्षातच त्याने अवघ्या रंगभूमिला कवेत घेतले.
झाडीचा ‘शुक्रतारा’ ठरतोय मुंडीपारचा अनुराग
By admin | Published: January 17, 2015 11:02 PM