लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : तिरोडा तालुक्यातील ग्राम भिवापूर येथे रविवारी (दि.२४) सकाळी ९:३० वाजता रक्ताच्या थारोळ्यात सुनील चंद्रकुमार तुमडे (३२, रा. भुराटोला) याचा मृतदेह आढळला होता. या खून प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली. वैष्णवी गणेश सुरणकर (१९, रा. भिवापूर) व मंगेश माणिकचंद रहांगडाले (२४, रा. भुराटोला) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
रविवारी (दि.२४) सकाळी ९:३० वाजेदरम्यान भिवापूर येथील नाल्याजवळ सुनील तुमडे याचा मृतदेह आढळला होता. धारदार हत्याराने डोक्यावर वार करून त्याचा खून करण्यात आला होता. सुनीलची आई चंद्रकला तुमडे (रा. भुराटोला) यांच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता अन्वये २५ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल केला. प्रकरणाचे गांभीर्य बघता पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांनी प्रकरणाचा उलगडा करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखा तसेच तिरोडा पोलिस निरीक्षकांना दिले होते, वरिष्ठांच्या निर्देशाप्रमाणे उपविभागीय पोलिस अधिकारी साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक संजय तुपे, महिला पोलिस उपनिरीक्षक वनिता सायकर, पोलिस अंमलदार प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, सुबोध बिसेन, इंद्रजित बिसेन, चित्तरंजन कोडापे, सुजित हलमारे, रियाज शेख, छगन विठ्ठले, संतोष केदार, दुर्गेश पाटील, राम खंदारे, मुरली पांडे, तिरोडा येथील पोलिस निरीक्षक अमित वानखेडे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक संजय कवडे, पोलिस उपनिरीक्षक तेजस कोंडे, अंमलदार योगेश कुळमते, सूर्यकांत खराबे, नीलेश ठाकरे, शैलेश पटले, उत्तरेश्वर घुगे, अमित गायकवाड यांनी प्रकरणाचा उलगडा करून वैष्णवी सुरणकर व मंगेश रहांगडाले यांना अटक केली. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना शनिवारपर्यंत (दि.३०) पोलिस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कवडे करीत आहेत.
सुनीलसोबत इन्स्टाग्रामवर केली मैत्री वैष्णवी ही मंगेश रहांगडाले याची मैत्रीण आहे. भावाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी मंगेशने वैष्णवीचा वापर केला. वैष्णवीला इन्स्टाग्रामवरून सुनीलसोबत मैत्री कर आणि त्याला भेटायला बोलाव. भेटायला आल्यावर आपण त्याचा काटा काढू असे ठरले. त्यानुसार वैष्णवीने सुनीलसोबत मैत्री करून त्याला रात्रीच्या वेळी भिवापूर येथे भेटायला बोलावले. सुनील तिला भेटायला भिवापूर येथे गेल्यावर सुनीलच्या डोक्यावर कुऱ्हाडीने घाव घालून त्याचा खून केला.
आरोपींच्या शोधासाठी नेमले होते खबरी या खुनातील आरोपींच्या तपासासाठी तिरोडा पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, एवढेच नव्हे तर खबरीही नेमण्यात आले होते. आरोपींचा शोध घेत असताना घटनास्थ- ळावरून प्राप्त माहिती, परिस- रातील नागरिकांची केलेली विचारपूस, मृताचा पूर्वेतिहास आणि नेमण्यात आलेल्या खब- रींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे खुनातील आरोपींपर्यंत पोलिस पोहोचले.
खुनाचा बदला खून१८ मे २०२३ च्या रात्री आरोपी मंगेश रहांगडाले याचा भाऊ गुरुदास माणिकचंद रहांगडाले (२८, रा. भुराटोला) याचा सुनीलचे वडील चंद्रशेखर तुमडे याने खून केला होता. त्या खुनाचा वचपा काढण्यासाठी आरोपी मंगेश रहांगडाले याने कट रचून सुनीलचा खून केला. या खुनात वैष्णवी सुरणकर हिने त्याला मदत केली. खून करून मंगेश रहांगडाले मुंबईला पळून गेला होता. पोलिसांनी त्यास मुंबई येथून ताब्यात घेतले.