गोरेगाव : माझ्या मुलाची आत्महत्या नसून त्याची हत्या करण्यात आल्याचा आरोप मुलाचे वडील इंदर भोयर यांनी केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशीच न करता आत्महत्येची नोंद करुन तपास बंद केला. त्यामुळे याप्रकरणाची चाैकशी करण्याची मागणी इंदर भोयर यांनी जिल्हा अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील ग्राम हलबीटोला (तेढा) येथील दीपक इंदर भोयर (२५) हा ४ सप्टेंबरला ११ वाजताच्या सुमारास घरुन निघाला. त्यानंतर दुपारी २ वाजताच्या दरम्यान गावातील लोकांना तलावाच्या पाळीवर त्याचे कपडे व मोबाईल व चप्पल आढळले. ही माहिती घरच्यांना मिळताच त्यांनी हे कपडे दिपकचे असल्याचे सांगितले. त्यानंतर घरच्यांनी व गावकऱ्यांनी इकडे तिकडे दीपकचा शोध केला पण तो कुठेच सापडला नाही. ५ सप्टेंबरला पुन्हा तलावात व परिसरात शोध केला पण दीपकचा पत्ता लागला नाही. त्यानंतर त्याच दिवशी २ वाजताच्या दरम्यान दीपकचे वडील इंदर भोयर व गावातील पोलीस पाटील यांनी गोरेगाव पोलीस स्टेशनला जाऊन दीपक बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत ढिवर आणि गावातील १०-१२ लोकांनी संपूर्ण तलावात शोध घेतला परंतु दिपकचा शोध लागला नाही. ७ सप्टेंबर सकाळी ७ वाजता तलावाच्या काठावर गावातील ३-४ लोकांना पाहणी केलेल्या ठिकाणीच प्रेत तरंगताना आढळले. ते प्रेत दीपकचे होते. दीपकचे कुटुंबीय, गावकरी, पोलीस पाटील यांनी घटनास्थळी जावून मृतदेहाची पाहणी केली. त्यानंतर दिपकचे वडील व पोलीस पाटील यांनी गोरेगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलिसांनी पोलीस पाटील यांना प्रेत ज्या ठिकाणी आहे, तिथेच डॉक्टर शव विच्छेदन करण्यासाठी येत आहेत. त्याच ठिकाणी सरण रचायला सांगितले. ४ वाजताच्या सुमारास डॉक्टर घटनास्थळी आले व प्रेताची पाहणी करुन गोरेगावला शवविच्छेदन करण्यासाठी आणायला सांगितले. सर्व झाल्यानंतर दीपकच्या प्रेताचे अंतिम संस्कार करण्यात आले.
............
घटनेच्या १२ दिवसानंतर चौकशी नाही
ही घटना घडून १२ दिवसाला कालावधी लोटूनही ठाणेदार गोरेगाव व बिट जमादार यांनी कुठलीही चौकशी केली नाही व कुणाचे बयाणही घेतले नसल्याचा आरोप इंदर भोयर यांनी केला आहे. दीपकने आत्महत्या केली असे नमुद करुन चौकशी बंद केली. दीपकचे वडील इंदर भोयर व दीपकची पत्नी यांनी ही आत्महत्या नसून दिपकची हत्या केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करुन दिपकला न्याय मिळवूृन देण्यासाठी पोलीस अधीक्षकांना शुक्रवारी इंदर भोयर यांनी निवेदन दिले आहे.