गोंदिया : रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या हिवरा येथील शासकीय कृषी महाविद्यालयाजवळील वन विभागाच्या मोकळ्या जागेतील एका झाडाला तरुणाचा मृतदेह लटकलेल्या स्थिती आढळला. तरुणाच्या गळ्यावर जखमा आढळल्याने त्याचा खून झाल्याचे बोलले जाते. ही घटना सोमवारी (दि.२०) सकाळी उघडकीस आली. यासंदर्भात रामनगर पोलिसांनी खुनाची नोंद केली आहे. संदीप भाऊलाल चिखलोंडे (२९), रा. चांदणीटोला (नागरा), ता. जि. गोंदिया असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार रामनगर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या शासकीय कृषी महाविद्यालय हिवराजवळील वन विभागाच्या मोकळ्या जागेत संदीप चिखलोंडे याचा मृतदेह झाडाला लटकलेला स्थित सोमवारी सकाळी दूध घेऊन जाणाऱ्या लोकांना आढळला. एक तरुण गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याची माहिती उमेश ओमकार माहुले, रा. हिवरा याने पोलिस पाटील विनोद नंदेश्वर यांना दिली. नंदेश्वर यांनी जाऊन खात्री केली असता वन विभागाच्या मोकळ्या जागेत एका झाडाला मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. या घटनेसंदर्भात रामनगर पोलिसांनी भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
धारदार हत्याराने मारून केला खून
संदीप चिखलोंडे याच्या मानेवर धारदार शस्त्राने मारून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर त्याच्या गळ्याला गमछा, मफलरसारख्या कपड्याने बांधून झाडाला लटकविले. त्याच्या मानेवर धारदार शस्त्राने वार केल्यामुळे जागोजागी रक्ताचा सडा पडलेला होता.
१० फुटावर होत्या दारूच्या बॉटल्या
मृत संदीप चिखलोंडेच्या गळ्यावर जखमा होत्या. खाली जमिनीवर आजूबाजूला रक्त पडलेले होते. त्यापासून १० फूट अंतरावर रिकाम्या दारूच्या बाटल्या पडलेल्या होत्या. त्या पिल्यानंतर त्याचा खून झाला असावा असा कयास लावला जात आहे. त्याचा खून करणारे ओळखीचेच असावेत, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आरोपींच्या शोधासाठी दोन चमू रवाना
संदीपचा खून करणारे ओळखीचेच असावेत असा कयास लावला जात आहे. दारूपार्टी झाल्यानंतर गळ्यावर धारदार हत्याराने मारून त्याचा खून करण्यात आला. हे कृत्य करणारे आरोपी त्याच्या ओळखीचेच असावेत यासाठी रामनगर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचे प्रत्येकी एक अशा दोन चमू गठित करून आरोपींच्या शोधासाठी पोलिस रवाना झाले आहेत.