गोंदिया : टाईल्स घसाईचे काम करणाऱ्या दोन मजुरांचा खून करण्यात आल्याची घटना शहरातील रावण मैदान परिसरातील एका निर्माणाधिन इमारतीत शुक्रवारी (दि.२५) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणात सोबतच काम करणाऱ्या मजुराने आपसी वादातून दोघांना ठार केल्याचे त्यांच्यासोबतच्या मजुराने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. निरंजन हरिचरण भारती (३८) व अमन नंदलाल भारती (२०,रा. रतनपुरा, उत्तरप्रदेश) असे खून झालेल्या मजुरांचे नाव आहे.
फिर्यादी खेमन कपिलदेव यादव (२७,रा. भिका, बिहार) याने दिलेल्या तक्रारीनुसार, ठेकेदार नंदलाल भारती याने फिर्यादीला २ महिन्यांपूर्वी कामासाठी गोंदिया येथे आणले तेव्हापासून खेमन यादव, निरंजन भारती, अमन भारती व बलवान रॉय हे चौघे रावण मैदान परिसरात बांधकाम सुरू असलेल्या नंदलाल गोपलानी यांच्या घरी राहत होते. त्यात फिर्यादी गच्चीवर झोपत असून तिघे खाली असलेल्या रूममध्ये झोपत होते. गुरुवारी (दि.२४) रात्री सुमारे ८.३० वाजतादरम्यान चौघांनी जेवण केले व फिर्यादी गच्चीवर झोपण्यास गेला. मात्र, गुरुवारी (दि.२५) सकाळी ७ वाजतादरम्यान फिर्यादी उठून खाली आला असता त्याला निरंजन भारती व अमन भारती दोघे पडून असल्याचे व त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे आढळले. तसेच बलवान रॉय झोपत होता तेथे रक्ताने माखलेला लाकडी बत्ता टेकलेला दिसला. फिर्यादीने इमारतीत शोधले मात्र बलवान रॉय तेथून पसार झाला होता. विशेष म्हणजे, बलवान रॉय थोड्या-थोड्या गोष्टींवरून निरंजन व अमन यांच्यासोबत भांडण करत होता. त्यानेच दोघांचा खून केला असावा, असे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. प्रकरणी शहर पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून तपास ठाणेदार महेश बनसोडे करत आहेत.
.............
पाेलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट
शहरातील सिंधी कॉलनी रावण मैदान परिसरात शुक्रवारी (दि.२५) सकाळी दोन मजुरांच्या खुनाची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली तसेच शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार महेश बनसोडे यांना सूचना केल्या. याप्रकरणातील आरोपीच्या शोधात पोलिसांची दोन तीन पथके रवाना झाल्याची माहिती आहे.