लोकमत न्यूज नेटवर्कचिचटोला : मुरदोली येथील जि.प. शाळेचे सर्व वर्ग लोकसहभागातून डिजिटल झाले. विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक शिक्षणासाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने ही शाळा सर्वांगिण प्रगतीच्या वाटेवर आहे.सर्व वर्ग डिजिटल, इंट्रॅक्टीव्ह बोर्ड व प्रोजेक्टरवर मुलांना शिक्षण, शाळेला प्रशस्त इमारत, मुला व मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, दोन एकर जागेत खेळाचे मैदान, मोठी सुरक्षाभिंत, शालेय परिसरात सुंदर बागेची निर्मिती व परसबागेत विविध पालेभाज्यांची लागवड ही शाळेची प्रमुख वैशिष्ट्ये ठरत आहेत. शाळा सिद्धी उपक्रमात ए ग्रेड, विविधरंगी परिपाठ, प्रशिक्षीत शिक्षक वर्ग, रॅम्पची सुविधा, पिण्याच्या पाण्यासाठी आॅरो व हात धुण्यासाठी हॅन्डवॉश स्टेशन, स्वच्छ व सुंदर गणवेश, बालसभा व राष्टÑीय सण साजरे करणे तसेच विविधरंगी परिपाठ यामुळे पालक आपल्या पाल्यांच्या प्रवेशासाठी आकर्षित होत आहेत.शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये ज्ञानरचनावादी व आनंददायी शिक्षण, बोलके विद्यार्थी, वाचनकुटीत विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण करणे, पक्ष्यांना निवारा व पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था, शालेय परिसर व गावात वृक्षारोपण व आॅक्सीजन प्लॅन्ट यांचा समावेश आहे. तसेच विद्यार्थ्यांना कार्यनुभवाच्या वेळी शिक्षक पी.सी. डोडारे नाव व इतर वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण देतात. त्यामुळे विविध विषयांबाबत विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढत आहे.मुख्याध्यापक दीपक एम. कापसे व शालेय व्यवस्थापन विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी व बागेची निर्मिती करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. आतापर्यंत लोकसहभागातून १ लाख ३० हजार रूपयांची देणगी सदर शाळेला मिळाली आहे. त्यातून शाळा प्रगतीच्या मार्गावर अग्रेसर आहे.सदर शाळेच्या विकासासाठी गटशिक्षणाधिकारी साकुरे व दिघोरे यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभले व लाभत आहे. उपमुख्य कार्यपालन अधिकारी (पंचायत) यांनीसुद्धा भेट देऊन शाळा प्रगतीपथावर कशी न्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. शाळेत प्रबोधन वर्ग, अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम, सांस्कृतिक केंद्रस्तरीय कार्यक्रम, केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शन त्यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आले. शाळेत विद्यार्थ्यांना कवायत शिकविण्याचे काम पी.सी. खोटेले सांभाळतात. तर नलिनी माटे व प्रतिभा सिंद्राम हे स्पर्धा परीक्षेवर मार्गदर्शन करतात. त्यामुळे सदर शाळेची उत्तरोत्तर प्रगती होत आहे.
मुरदोली शाळा प्रगतीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:01 PM
मुरदोली येथील जि.प. शाळेचे सर्व वर्ग लोकसहभागातून डिजिटल झाले. विद्यार्थ्यांच्या अत्याधुनिक शिक्षणासाठी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करण्यात आल्याने ही शाळा सर्वांगिण प्रगतीच्या वाटेवर आहे.
ठळक मुद्देलोकसहभागातून १.३० लाख : सर्व वर्ग झाले डिजिटल