वडिलांचा आरोप : दोषींवर कारवाई करण्याची मागणी लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा: तालुक्यातील ढिवरटोला (सावंगी) येथील दुर्गेश्वरी खनोज भगत या २७ वर्षीय विवाहितेचा चिमुकल्यासह वाघनदीत बुडून मृत्यू झाला. मायलेकाच्या रहस्यमय मृत्यूमुळे विविधप्रकारचा संशय व्यक्त केला जात असून माझ्या मुलीचा खून करुन तिला मुलासह वाघनदीत फेकण्यात आले, असा आरोप दुर्गेश्वरीचे वडील लोकचंद मुन्नालाल कटरे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी संबंधित अधिकारी आणि पदाधिकारी यांना निवेदन सादर केले. तसेच घटनेचा निष्पक्ष व सखोल तपास करुन योग्य कारवाई करीत दोषीला कठोर शिक्षा व्हावी, अशी त्यांनी मागणी केली आहे.लोकचंद कटरे यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या मुलीचा विवाह १५ एप्रिल २०१३ रोजी जातीय परंपरेनुसार ढिवरटोला (सावंगी) येथील खनोज भगत याच्याशी झाला. तिला तेजस खनोज भगत (वय अडीच वर्षे) आणि जितू खनोज भगत (सहा महिने) अशी दोन अपत्ये झाली. लग्नानंतर काही दिवसांनी दुर्गेश्वरीला सासरची मंडळी माहेरुन (गोर्रे, ता. सालेकसा) दागिने व रोख रक्कम आणण्याची मागणी करीत होते. पती खनोज भगत, सासरा मनोज भगत, जाऊ मनिषा भगत, आत्या हेमलता तुरकर, काकासासरे राजकुमार भगत व इतर कुटुंबीय मंडळी वारंवार शिवीगाळ करून मानसिक छळ करीत होते. दागिने आण नाही तर माहेरी जा, असा दबावसुध्दा टाकत होते. अनेकवेळा त्यांनी शारीरिक छळसुध्दा केला. याबाबत मुलीने माहेरी सांगितले होते. तेव्हा दोन्हीकडील मंडळींनी आपसात बसून एकमेकांची समजूत घालण्याचा प्रयत्नसुध्दा केला होता. परंतु दुर्गेश्वरीला सासरच्या मंडळीने त्रास देणे बंद केले नाही. तिला मुकाट्याने त्यांचा त्रास सहन करावा लागत असे. आपला संसार उध्दवस्त होऊ नये म्हणून दुर्गेश्वरी आपल्या मुलांसह घर सांभाळत रहायची व अनेक बाबींकडे दुर्लक्ष करायची. १७ जुलै रोजी ढिवरटोला (सावंगी) येथे घराच्या मागून वाहत असलेल्या वाघ नदीत दुर्गेश्वरी भगत आणि तिचा चिमुकला जितू भगत वाहून गेल्याची घटना घडली. ती घटना सहज वाहून गेल्याची किंवा आत्महत्येची नसून दुर्गेश्वरी व तिच्या चिमुकल्याला मारहाण करुन नदीत फेकल्याचा संशय आहे. दुर्गेश्वरीचे पती खनोज भगत मद्यपान करुन केव्हाही आपल्या पत्नीला पैशांसाठी मारहाण करीत असायचा. त्यामुळे संशयाला आणखी बळ मिळत असल्याचे मृत दुर्गेश्वरीच्या वडिलांचे म्हणणे आहे.
माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:47 AM