पालकमंत्री बडोले : एअर होस्टेस व केबीन क्रू कार्यशाळेचा समारोपगोंदिया : या जिल्ह्यातून आता दरवर्षी प्रशासकीय व इतर सेवेत युवक यशस्वी होत असल्याच्या बातम्या येत आहेत. ही जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे. परंतु अनेक असे क्षेत्र आहेत जिथे विद्यार्थी माहिती व योग्य मार्गदर्शनाअभावी पोहोचू शकत नाहीत. त्यांचे स्वप्न पूर्ण होण्यास अडथळे निर्माण होतात. डॉ.आंबेडकरांच्या विचार व आदर्श घेवून चालत असताना पालकमंत्री या नात्याने या जिल्ह्यातील तरुणांचे स्वप्न हेच माझे स्वप्न आहे. ते पूर्ण करण्याकरिता सर्व प्रकारची मदत करणार, अशी ग्वाही पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.ते रविवारी सायंकाळी गोंदियात भारतीय जनता पार्टी व ना.राजकुमार बडोले मित्र परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय एअर होस्टेस व केबीन क्रू कार्यशाळेच्या समारोपीय कार्यक्रमात बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, माजी भाजपा जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, रविकांत बोपचे, प्रशिक्षक हेमंत चुटे, प्राची गरुड, भाजयुमो जिल्हाध्यक्ष पंकज रहांगडाले, शहर अध्यक्ष सुनील केलनका, प्रदीपसिंग ठाकूर, मिनू बडगुजर आदी प्रामुख्याने उपस्थित होते.ना.बडोले म्हणाले, २१ मे रोजी जिल्ह्यातील पंधराशेवर युवक-युवतींनी येथे हजेरी लावली. विमान वाहतूक सेवेत जाण्याचे स्वप्न ग्रामीण भागातील तरुण-तरुणीचे आहे. मात्र त्यांच्या पंखांना बळ मिळत नसल्याने त्यांचे स्वप्न अपूर्ण राहते. या कार्यशाळेतून युवकांमधील इच्छाशक्ती व आत्मविश्वास जागृत होऊन ते नक्कीच यशस्वी होतील आणि विमान वाहतूक सेवेत काम करताना दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भाजयुमोने हा कार्यक्रम कमी वेळात यशस्वी करुन दाखविला याबद्दल त्यांनी सर्वांचे कौतुक केले. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी कार्यशाळेत उपस्थित प्रशिक्षणार्थ्यांना शुभेच्छा देत ‘गोंदियाचे युथ, होणार एअर इंडिायाचे दूत’, असे घोषवाक्य देत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. प्रशिक्षक हेमंत सुटे यांनी गोंदिया जिल्ह्यातील युवकांमध्ये मोठी प्रतिभा लपलेली असून या दोन दिवसात त्यांनी आपली चुणूक दाखविली आहे. यातील बहुतांश युवक व युवती भविष्यात एअर होस्टेस व केबीन क्रू होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यशाळेत सहभागी झालेल्या रिना कटरे, मयुरी धामने, अमर मेरगवार, राहूल खिलावत आदी युवक-युवतींही आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी विनोद अग्रवाल व रविकांत बोपचे यांनी युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन जयंत शुक्ला यांनी तर आभार पंकज रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमासाठी भाजयुमोचे जिल्हा महामंत्री पंकज सोनवाने, ऋषीकांत शाहू, ललीत मानकर, सुनील येरपुडे, तालुकाध्यक्ष बाबा चौधरी, गुड्डू डोंगरवार, राजू शाहू, संदीप कापगते, गौरी पारधी आदी अनेकांनी परिश्रम घेतले. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यातील युवकांचे स्वप्न हेच माझे स्वप्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2016 1:50 AM