गोंदिया : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव देवळी मतदारसंघाचे आमदार रणजित कांबळे यांनी ९ मे रोजी जिल्हा परिषद वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ करून शासकीय कामकाजात अडथळा निर्माण केला. या घटनेचा निषेध करीत खोडशिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर गहाणे यांनी मागील बुधवारपासून छत्री आंदोलन सुरू केले आहे, तर मंगळवारपासून गोंदिया जि. प.समोर आंदोलन सुरू केले आहे.
आमदार रणजित कांबळे यांनी वर्धा येथील जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना मोबाईलवरून अश्लील शिवीगाळ करून अपमानास्पद भाषेचा वापर केला. एवढेच नव्हे, तर जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. आमदार कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी, त्यांना अजूनही अटक करण्यात आलेली नाही. कोरोनाच्या संकटकाळात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी अहोरात्र रुग्णसेवेत कार्यरत आहेत. त्यांनाच अशा भाषेत बोलून अपमानीत केले जाणे योग्य नाही. एकीकडे डॉक्टरांना कोरोना योध्दा म्हटले जात आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्यावरच हल्ले होत असताना, राज्य सरकारकडून कुठलीच कारवाई केली जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या डॉक्टरांमध्ये आता संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. माझे आंदोलन हे कुठल्या व्यक्तीविरुध्द नसून वाईट प्रवृत्ती आणि वाईट घटनांविरुध्द आहे. अशा घटनांना वेळीच आळा घालण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, यासाठीच मागील सात दिवसांपासून मी छत्री आंदोलन सुरू केले असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. समीर गहाणे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
..........
प्रशासन कधी घेणार दखल?
अलीकडे डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. कोरोना संसर्ग काळात डॉक्टर्स आपला जीव धोक्यात घालून चोवीस तास सेवा देत आहेत. मात्र त्यांच्यावरच हल्ले करणाऱ्यांवर कारवाई करण्यात कुचराई केली जात आहे. डॉ. समीर गहाणे यांनी मागील सात दिवसांपासून या सर्व प्रकाराबद्दल छत्री आंदोलन सुरू केले आहे. पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही.