गोंदिया : रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीची मुदत बुधवारी (दि. ३०) संपली; पण अद्यापही २० लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी होणे बाकी आहे. त्यातच धान खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ दिली जाणार असल्याचे सांगितले जात होते; पण बुधवारी सायंकाळी उशिरापर्यंत रब्बीतील धान खरेदीला मुदतवाढीचे आदेश जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाला प्राप्त झाले नव्हते. त्यामुळे मुदतवाढ की धान खरेदी बंदचे गूढ कायम होते.
मागील खरीप हंगामात खरेदी केलेल्या धानाची अद्यापही उचल करण्यात करण्यात आली नाही. परिणामी लाखो क्विंटल धान गोदामांमध्ये पडून आहे. त्यामुळेच यंदा रब्बीतील धान खरेदी एप्रिल महिन्यापासून सुरू झाली नाही. खरीप हंगामाला सुरुवात झाली तरी रब्बीतील धान खरेदीचा तिढा सुटला नाही. परिणामी शाळा अधिग्रहीत करुन गोदामांवर तोडगा काढण्यात आला. मात्र, याला सुध्दा बराच विलंब झाला. त्यामुळे आतापर्यंत केवळ ४ लाख ३३ हजार क्विंटलच धान खरेदी करण्यात आली. अद्यापही २० लाख क्विंटलहून अधिक धान खरेदी होणे शिल्लक आहे. त्यातच बुधवारी धान खरेदीची मुदत संपली. मुदत संपण्यापूर्वीच मुदतवाढीचे आदेश येणे अपेक्षित होते. मात्र, यासंदर्भात आदेश प्राप्त झाले नव्हते. राज्य सरकारने रब्बी हंगामातील धान खरेदीला १५ दिवसांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविला; पण केंद्राकडून अद्यापही मुदतवाढीसंदर्भात कुठलेच पत्र पात्र झाले नसल्याने धान खरेदी सुरू राहणार की बंद, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
..........
लाखो क्विंटल धान खासगी व्यापाऱ्यांच्या दारात
यंदा शासनाच्या नियोजनअभावी रब्बी हंगामातील धान खरेदीचे बारा वाजले आहे. रब्बीतील धान खरेदीची मुदत संपली तरी पूर्ण धान खरेदी झालेली नाही. त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना लाखो क्विंटल धान खासगी व्यापाऱ्यांना अल्प दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.