स्थायी प्रशासन नाही : निधी परतीच्या मार्गावर अर्जुनी-मोरगाव : येथील ग्रामपंचायत विसर्जित होऊन नगर पंचायत अस्तित्वात आली. मात्र स्थायी मुख्याधिकारी व कर्मचारीवृंद नसल्याने कामकाज ठप्प पडले आहे. नगरातील विकासकामे, जनतेची गाऱ्हाणी व उद्भवणाऱ्या ज्वलंत समस्या ऐरणीवर आहेत. शासनाकडून आलेल्या निधीचा महिनाभरात खर्च न झाल्यास हा निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे. नगरसेवक आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. महाराष्ट्र शासनाने तालुका स्थळावरील ग्रामपंचायतींना नगरपंचायतीचा दर्जा दिला. मात्र मनुष्यबळ उपलब्ध करून दिले नाही. दर्जा मिळून सहा महिने लोटले. या कालावधीत आतापर्यंत तब्बल डझनभर प्रशासक नेमले. ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी नगरपंचायतीची अवस्था आहे. रहिवासी दाखले व जन्ममृत्यूची नोंद या पलीकडे कामेच होत नाहीत. या ठिकाणी अभियंता, लिपिकवर्गीय कर्मचारी नियुक्त नाहीत. रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर डोलारा उभा आहे. महिनाभरापूर्वी एका नायब तहसीलदाराची प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. ८-१० दिवस कारभार सांभाळला आणि लगेच ते प्रशिक्षणावर निघून गेले. दुसऱ्या नायब तहसीलदाराला १५ दिवसांपूर्वी प्रभार दिला. त्यांनी अद्याप नगरपंचायत कार्यालयाची पायरी शिवली नाही. तहसील कार्यालयात बसून स्वाक्षरीची कामे केली जात आहेत. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाने जबाबदारी सोपविली. मात्र त्यांना केवळ अवैध खनिजाचे ट्रॅक्टर अडविण्यातच स्वारस्य आहे. कारभार चालत आहे, यातच जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधी धन्यता मानतात. दलीत वस्ती सुधार योजनेचा निधी आलाच नाही. हा निधी भंडारा जिल्ह्यातील काही नगरपंचायतींना प्राप्त झाला आहे. मात्र येथे कुणी वालीच नसल्याने विकासकामांना खीळ बसली आहे. चौदावा वित्त आयोग व इतर निधी मिळून सुमारे ६० लाख रुपयांचा निधी नगरपंचायतकडे शिल्लक आहे. मात्र हा निधी खर्च करण्यासाठी येथे जवाबदार अधिकारीच नसल्याने खोळंबा होत आहे. ३१ मार्चपर्यंत कामे न झाल्यास काही निधी परत जाण्याच्या मार्गावर आहे.नगरसेवक नगरपंचायत कार्यालयात लोकांची कामे घेऊन येतात. मात्र त्यांची कामे होत नसल्याने त्यांना निराश होऊन परत जावे लागते. त्यामुळे त्यांनी आगामी काळात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नगरपंचायतचे बांधकाम सभापती प्रकाश शहारे, गटनेता देवेद्र टेंभरे, नरगसेवक मुकेश जायसवाल, माणिक घनाडे, यशकुमार शहारे यांनी लोकमतशी बोलताना सदर प्रतिक्रिया व्यक्त केली. (तालुका प्रतिनिधी)
नगर पंचायतीचे भिजत घोंगडे
By admin | Published: March 02, 2016 2:15 AM