नवीन कामांना मंजुरी नाही : अवैध बांधकामांना पाठबळआमगाव : आमगाव हे शहर तालुक्यातील मुख्यस्थान येथील विकासाचा प्रारूप तालुक्यातील ग्रामपंचायतीकरिता मॉडल म्हणून पुढे येतो. मात्र नगर पंचायतचा दर्जा मिळून प्रशासकांच्या हातात कारभार आल्याने विकासकामांना मंजुरी नसून विकासकामे ठप्प पडली आहेत. आमगाव हे तालुकास्थळ असून येथील ग्रामपंचायत तालुक्यातील मुख्य ग्रामपंचायत आहे. वाढती लोकसंख्या बघता शासनाने १६ फेबु्रवारी २०१५ ला आमगावला नगर पंचायत दर्जा देत येथे प्रशासकांची नियुक्ती केली. शासनाने आमगाव ग्रामपंचायतला नगर पंचायतचा दर्जा देताना मुलभूत मागणीकडे गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे येथील नागरिकांनी नगर पंचायत विरूद्ध विरुद्ध न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे येथे एक वर्षापासून प्रशासकांचा कारभार सुरू आहे.येथील अपूर्ण कामे पूर्ण व्हावी यासाठी नागरिकांनी प्रशासकांना अनेकदा मागणी केली. परंतु विकासकामांना प्रारंभ करण्यात आला नाही. येथील नाल्यांचे बांधकाम, दुरुस्ती, स्वच्छता अभियान, पिण्याच्या पाण्याची समस्या, सिंचन सुविधा, रस्ते दुरुस्ती व बांधकाम, शासकीय जमिनीवरील वाढते अतिक्रमण, अवैध बांधकाम, आरोग्य समस्या, शासकीय रुग्णालयांचे हाल, आर्थिक दुर्बलांची निवास योजना तसेच शासकीय योजनांचे लाभ या मुलभूत आवश्यकता नगर पंचायत कार्यालयात प्रशासकांपुढे दप्तरजमा झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रशासकांचे कारभार डोईजड झाले आहे.आमगाव नगर पंचायत प्रभागामध्ये नाल्यांच्या अस्वच्छतेमुळे गलिच्छ वातावरण निर्माण झाले आहे. नाल्यांची दुरुस्ती व पूर्ण बांधकामाला मंजुरी नसल्याने घाणीचे वातावरण परिसरात पसरले आहे. तसेच वाढत्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अस्वच्छता व आरोग्य समस्यांमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु अस्वच्छता व जंतुनाशक औषधांची फवारणीकडे विभागाने हात घातला नाही. प्रभाग क्रमांक दोन, तीन, चार व सहामध्ये प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे रस्ते, सांडपाणी व अस्वच्छतेची समस्या वाढली आहे.प्रशासकांचे कार्यकाळ एक वर्ष पूर्ण झाले आहे. या नगर पंचायत गावातील विकास कामांना मंजुरीच मिळत नाही. तर नगर पंचायत हद्दीत असलेल्या शासकीय जमिनीवर मात्र अवैध बांधकामाना पाठबळ देण्यात आले आहे. त्यामुळे विकासकामांना पाठ तर अवैध बांधकामांना पाठबळ अशी अवस्था नगर पंचायतमध्ये दिसून येत आहे. आमगाव ग्रामपंचायतला शासनाने नगर पंचायतचा दर्जा दिला आहे. परंतु नागरिकांनी नगर पंचायत ऐवजी नगर परिषद व्हावी यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. परंतु एक वर्ष लोटूनही निर्णय होत नसल्याने प्रशासकांचा कार्यकाळ नागरिकांना डोईजड होत आहे. विकास व शासन योजनांचे कार्य ठप्प पडल्याने नागरिक हैरान झाले आहेत. आता शासनाने योग्य निर्णय घ्यावा अशी मागणी नागरिक करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)
नगर पंचायतची विकासकामे ठप्प
By admin | Published: February 27, 2016 2:11 AM