शेतकऱ्यांचा मित्र रस्त्यावर : सर्प संवर्धनाकडे लक्ष देण्याची गरज
नरेंद्र कावळे
आमगाव : साप म्हटल्यावर कोणाचाही थरकाप उडतो व याच सापाला आपण शेतकऱ्यांचा मित्र म्हणूनही ओळखतो. जंगलावरील अतिक्रमण, अंधश्रद्धा आणि विषाची तस्करी अशा तिहेरी कात्रीत सापडलेल्या सापांच्या अनेक प्रजाती धोक्यात आल्या आहेत. परिणामी नागराजाचे जीवन आज धोक्यात आले आहे.
शेती, नवीन रस्ते, नवीन प्रकल्प, कारखाने, नवीन घर बांधकाम, उभारणीसाठी होणाऱ्या जंगलतोडी यामुळे सापांची आश्रयस्थाने नष्ट होत आहेत. निसर्गचक्रातील महत्वाचा घटक असलेल्या सापांच्या संरक्षणाकडे दुर्लक्ष केले जाते आहे. साप हा केवळ मानवमित्र नसून तो निसर्गमित्रही आहे. सापाचे मुख्य अन्न उंदीर आहे. याशिवाय पिकांवरील कीटक, डासांच्या अळ्या, घुशी यांवर साप नियंत्रण ठेवतो. अशा मदत करणाऱ्या सापाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. पर्यावरणवादी संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन समिती मार्फत सापांच्या संरक्षणासाठी मोठया प्रमाणात जनजागृती केली जात असली तरी अंधश्रद्धा आणि भीतीपोटी सापांचा जीव घेण्याचे प्रकार कुठेही कमी झालेले नाहीत.
भारतात आढळणाऱ्या सापांच्या विविध प्रजातींपैकी केवळ १० प्रजाती विषारी आहेत. इतर प्रजाती मनुष्यासाठी घातक नाहीत. तरीही, साप चावल्याने मृत्यू होतो हा प्रचंड मोठा गैरसमज असल्याने साप दिसला की लगेच त्याला मारले जाते. प्रत्येक साप हा विषारी नाही असे वर्षानुवर्षे सांगितले जाते तरीही, त्याविषयीचा गैरसमज आणि इतर अनेक कारणांमुळे सापाच्या कित्येक प्रजाती आधीच नष्ट झाल्या आहेत. वन्यजीव कायदे कितीही कठोर असले तरीही, कायद्याच्या माध्यमातून त्यांना पुरेसे संरक्षण मिळत नाही. त्यामुळे सापांच्या सुरक्षिततेचा मुद्दा कळीचा झाला आहे. राज्यभरात सर्पमित्र आहेत व त्यांच्या कडून अनेक सापांना जीवनदान मिळाले आहे. आता गावात एकतरी सर्पमित्र दिसून येतो परंतु प्रत्यक्षात सापांविषयी संपूर्ण माहिती असलेले सर्पमित्र मोजकेच आहेत. काही सर्पमित्र सापांविषयी अर्धवट ज्ञान असलेले आहेत. प्रत्येक सापांचे वास्तवस्थान वेगवेगळ्या ठिकाणी असते व साप पकडल्यानंतर तो त्याच्या वास्तव स्थानीच सोडला जाणे आवश्यक असते. मात्र बऱ्याच सर्पमित्रांना सापांविषयी माहिती नसते. त्यामुळे पकडलेला साप कोणत्या प्रजातीचा आहे हे कळत नसल्याने कोणत्याही जंगलात सोडला जातो. मात्र अशावेळी सापाला अनुकूल असे वास्तवस्थान मिळत नसल्याने साप फार काळ जगू शकत नाहीत. उभयचर व सरपटणाऱ्या प्राण्यांचे आश्रयस्थान नष्ट होत असल्याने या प्राण्यांचे अस्तित्व नष्ट होण्याची अनेक कारण समोर आली आहेत. आपल्या परिसरातील जंगल झुडपे नष्ट होत चालली आहेत. जंगलात लागणारी आग पण एक प्रमुख कारण आहे. पावसाळ्यात बिळात पाणी गेल्याने सुध्दा साप रस्त्यावर येतात आणि भरघाव वाहनाखाली येऊन रोज शेकडो सापांचा मृत्यू होत आहे. वनविभागाने पुढे येऊन गांभीर्याने साप वाचवण्याची मोहीम बळकट करण्याची गरज आहे.
-----------------------------
सर्पमित्रांना मूलभूत सुविधा पुरविणे गरजेचे
सर्पदंश झाल्यानंतर कोणत्या प्रकारचा साप रुग्णाला चावला याविषयी डॉक्टर साशंक असतात. डॉक्टर तसेच सर्पमित्रांना सापांविषयी ज्ञान देण्याची जबाबदारी वनविभागाची असून सुध्दा लक्ष दिले जात नाही. वाघांच्या संवर्धनावर जेवढे लक्ष दिले जाते, तेवढे लक्ष उभयचर व सरपटणाऱ्या प्राण्यांकडे दिले जात नाही. त्यामुळे सापांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सरकारी उदासीनता अशीच कायम राहिली तर भविष्यात कदाचित सापांचे अस्तित्त्वच राहणार नाही. मग नागपंचमी कुणासाठी साजरी करणार, असाही प्रश्न उपस्थित होईल.