गोंदिया : मागील दोन महिने जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या नियंत्रणात होती. मात्र मार्च महिन्यात लगतच्या नागपूर, भंडारा, वर्धा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढू लागली. परिणामी या ठिकाणाहून येणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढण्यास मदत झाली. त्यामुळेच जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून कोरोना ॲक्टीव्ह रुग्णांचा आकडा ९०० च्यावर गेला आहे. त्यामुळे नागपूर आणि भंडाऱ्याने जिल्ह्याची काळजी वाढविल्याचे चित्र आहे. हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानक हे एक प्रमुख रेल्वेस्थानक असल्याने या ठिकाणी नागपूर, भंडारा आणि वर्धा येथून येणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. तसेच काही अधिकारी आणि कर्मचारी सुध्दा या जिल्ह्यातून दररोज अपडाऊन करतात त्यामुळे त्यांच्यापासून सुध्दा कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची कुठलीच तपासणी केली जात नाही. त्यामुळे सुध्दा कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने कठोर उपाययोजना करण्याची गरज आहे. अन्यथा जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
.............
.
दररोज येतात पाच ते सहा हजार प्रवासी
एसटी बस
गोंदिया जिल्ह्यात दररोज बस जिल्ह्यातील तसेच बाहेरील जिल्ह्यातील दीड ते दोन हजार प्रवासी करतात. यात नागपूर, भंडारा, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर येथील प्रवाशांचा प्रामुख्याने समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी आंतरजिल्हा बसफेऱ्या सुरूच आहेत. त्यातच एखाद्या प्रवासी कोरोना बाधित असल्यास त्याच्यापासून इतरही प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय बसस्थानकावर कोरोनाच्या अनुषंगाने तपासणीची कुठलीच सुविधा नाही.
.....
रेल्वे स्थानक
हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानक हे एक महत्वपूर्ण रेल्वे स्थानक आहे. लॉकडाऊनपूर्वी या रेल्वे स्थानकावर दररोज ७५ हून अधिक रेल्वे गाड्या धावत होत्या तर २५ हजारावर प्रवासी प्रवास करीत होते. मात्र सध्या स्थितीत ३५ रेल्वे गाड्या धावत असून तीन ते चार हजार प्रवासी प्रवास करतात. मात्र रेल्वे स्थानकावर प्रवाशांची कुठलीच तपासणी केली जात नाही. त्यामुळे सुध्दा जिल्ह्यात कोरोना संसर्गात वाढ होत आहे.
...........
ट्रॅव्हल्स
गोंदिया येथून मध्यप्रदेश, नागपूर, पुणे, जबलपूर येथे दररोज १०० हून अधिक ट्रॅव्हल्स धावतात. यातून जवळपास दोन ते तीन हजार प्रवासी ये-जा करतात. सध्या मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातील बसेस आणि ट्रॅव्हल्सवर बंदी घातली आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात प्रवासी वाहतूक बंद आहे. मात्र या गाड्यांमधून येणाऱ्या प्रवाशांमुळे सुध्दा जिल्ह्यात कोरोनाचा ग्राफ वाढत असल्याचे चित्र आहे.
..................
बाहेरगावावरून येणाऱ्यांची चाचणीच नाही
- लगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधून येणाऱ्यांची चाचणी होणे गरजेचे आहे. पण प्रत्यक्षात तसे काहीच केले जात नाही.
- जिल्ह्याच्या सीमेवरसुध्दा बाहेरुन येणाऱ्या प्रवासी आणि नागरिकांची कोरोनाच्या अनुषंगाने कुठलीच चाचणी केली जात नाही. यासंबंधी कुठल्याच उपाययोजना अद्यापही जिल्हा प्रशासनाने केल्या नाही.
- जिल्ह्यातील रेल्वे स्थानक, बसस्थानक, ट्रॅव्हल्स थांबतात त्या ठिकाणी बाहेरुन येणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग केली जात नाही. त्या संबंधीच्या सूचनासुध्दा अद्याप आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने केल्या नाही.
..................
अशी आहे आकडेवारी
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण :
कोरोनाचे एकूण बरे झालेले रुग्ण :
एकूण क्रियाशील असलेले रुग्ण :
गृहविलगीकरणात असलेले रुग्ण :
कोरोनाचे एकूण बळी :
.........