सडक-अर्जुनी : नागपूर मेट्रोचे आकर्षण केवळ नागपूरवासीयांनाच नाही, तर विदर्भवासीयांनाही आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मेट्रोमध्ये काय काळजी घेण्यात येत आहे. कुठल्या मार्गावर किती स्थानकांवर मेट्रो थांबते, मेट्रो स्थानकाचे वैशिष्ट्य काय, सेलेब्रेशन ऑन व्हील ही संकल्पना काय, ई-रिक्षा, ई-सायकल मेट्रो रेल्वेकरिता कशी उपयोगात आणायची, त्यामुळे नागपूरची मेट्रो ही भविष्यात विदर्भाची कशी शान असणार आहे, याची माहिती आपल्या मार्गदर्शनात मेट्रो रेल्वेच्या वतीने रश्मी परवाड यांनी सडक-अर्जुनी येथे मार्गदर्शनात दिली.
स्थानिक शेंडा रोड सडक-अर्जुनी येथे विदर्भ मेट्रो संवाद या मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भातून नागपुरात विविध कामांनी येणाऱ्या विविध नागरिकांना मेट्रोची संपूर्ण माहिती व्हावी, या उद्देशाने विविध जिल्ह्यांत ‘मेट्रो संवाद’चे आयोजन करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता प्रा. डॉ. राजकुमार भगत, आर. व्ही. मेश्राम, ओमेश्वर कापगते, प्रभाकर भेंडारकर, वामन लांजेवार, अनिल राजगिरे, सिद्धार्थ उंदिरवाडे, राजू फुले, अमोल बैस यांनी सहकार्य केले. प्रा. राजकुमार भगत यांनी संचालन केले, तर आर. व्ही. मेश्राम यांनी आभार मानले.