सहा जणांना अटक : आठ दिवसांची कोठडीगोंदिया : तिरोडा तालुक्याच्या विहिरगाव शेतशिवारात मंगळवारच्या सायंकाळी ७.३० वाजता दुचाकीने जाणाऱ्या दोघांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यात एकाचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. सदर खून प्रकरणात तिरोडा पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्या आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयाने आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राजेंद्रप्रसाद भाऊलाल नागपुरे (२६) रा.लोधीटोला (तिरोडा) हे मोटारसायकलने (एमएच ३५, वाय २१७४) विनायक कवतू चव्हाण (४६) रा. लोधीटोला यांच्यासोबत गावाला जात होते. बिर्सीवरुन लोधीटोलाकडे विहिरगाव कालव्याच्या पाळीने ते जात असताना आरोपी गजानन मनिराम उपरीकर (४०), शालीक मनिराम उपरीकर (५०), हरिश अनिल नागरिकर (१९), शिवंकर साखरवाडे (२६) रा.विहीरगाव, भीमराव पृथ्वीराज मोम (३७) रा.बिरसी व गणराज बलीराम साखरवाडे (४२) रा.बोपेसर या चौघांनी त्या दोघांवर काठ्यांनी हल्ला केला. यात राजेंद्रप्रसाद नागपुरे याचा मृत्यू झाला, तर विनायक चव्हाण गंभीर झाल्याने त्याला केटीएस जिल्हा समान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती आता धोकाबाहेर असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतक राजेंद्रप्रसाद नागपुरे व मुख्य आरोपी गजानन उपकरीकर हे दोघेही अवैध दारूचा व्यवसाय करीत होते. मृतक राजेंद्र मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा करायचा. त्याने गजाननलाही आपल्याकडून दारू घेऊन जा अशी तंबी दिली होती. यातून दोघांचा वाद झाला होता. त्या वादात मृतक राजेंद्रने गजाननला ठार करण्याची धमकी दिली होती. या धमकीचा वचपा काढण्यासाठी गजाननने त्याच्या खुनाचा डाव रचला आणि अखेर त्याला गजाननने यमसदनी पाठविले. या प्रकरणात सहा आरोपींचा समावेश असल्याने पोलिसांनी त्या सहाही जणांना अटक केली आहे. तिरोडा पोलिसांनी सदर आरोपींविरूध्द भादंविच्या कलम ३०२, ३०७ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यांना पकडण्याची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी देवीदास इलमकर, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक निखिल पिंगळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील उजवने, उपनिरीक्षक निलेश वाघ, निखील गोस्वामी, हलमारे यांनी केली. आरोपींना पोलीस कोठडी मिळावी यासाठी शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपींना दि.१६ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.(तालुका प्रतिनिधी)
दारू विक्रीतून झाली नागपुरेची हत्या
By admin | Published: April 09, 2016 1:58 AM