राष्ट्रवादीने काढली रॅली : राजाभोज यांच्या नामफलकाचे अनावरण गोंदिया: येथील जिल्हा क्रीडा संकुलाला चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांचे नाव देत नामफलकाचे अनावरण करण्यात आले. राजाभोज यांच्या जयंतीदिनाचे निमित्त साधून राष्ट्रवादी कॉंग्रेसने रविवारी (दि.२१) नामकरणाचा कार्यक्रम उरकून घेतला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल तसेच गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने गेल्या काही काळापासून राज्यशासनाकडे केलेल्या या मागणीला अखेर पूर्णविराम लागला. राष्ट्रवादी कॉंंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते प्रफुल पटेल यांनी गोंदिया परिसरात बहुसंख्येने वास्तव्यास असलेल्या पोवार समाजबांधवांचे आराध्य दैवत चक्रवर्ती सम्राट राजाभोज यांचे नाव नव्याने तयार होत असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलास द्यावे अशी मागणी राज्यशासनाकडे केली होती. आमदार राजेंद्र जैन यांनीही विधानपरिषदेत हा प्रश्न लावून धरला होता. यावर तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पटेलांची मागणी मान्य करून संबंधीत विभागास जिल्हा क्रीडा संकुलाला राजाभोज यांचे नाव देण्याविषयी निर्देश दिले होते. तसे पत्र सुद्धा पटेल यांना पाठविले होते. परंतु राज्यातील सत्ता पालट होऊन सत्तेत आलेल्या भाजप सरकारने या विषयावर काहीच हालचाल केली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसने रविवारी (दि.२१) जिल्हा क्रीडा संकुल परिसरात चक्र वर्ती राजाभोज यांच्या नामफलकाचे अनावरण केले. याकरिता पक्षाच्या कार्यालयातून जिल्हा क्रीडा संकुलपर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीत माजी आमदार दिलीप बंसोड, म्हाडा चे माजी सभापती नरेश माहेश्वरी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर, जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, गंगाधर परशुरामकर, देवेंद्रनाथ चौबे, महेश जैन, पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, मनोहर चंद्रीकापुरे, हिरालाल चव्हाण, बबलू कटरे, शिव शर्मा, कुंदन कटारे, प्रभाकर दोनोडे, अविनाश काशिवार, छोटू पटले, जितेश टेंभरे, राजेश चव्हाण, छाया चव्हाण, खुशबू टेंभरे, प्रेम रहांगडाले, उषा किंदरले, देवचंद तरोणे, दुर्गा तिराले, रजनी गौतम, कैलास पटले व मोठ्या संख्येत पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)आजपासून राजाभोज जिल्हा क्रीडा संकुल - जैनयापूर्वी पक्षाच्या कार्यालयात घेण्यात आलेल्या सभेत आमदार जैन यांनी, आता शासनाकडे मागणी करणार नसून आजपासून चक्रवर्ती राजाभोज जिल्हा क्रीडा संकुल असाच उल्लेख केला जाणार असल्याचे सांगीतले. याबाबत नामफलकाच्या अनावरण कार्यक्रमाची माहिती जिल्हा प्रशासनाला देऊन पुढील कार्यवाही करावी, असे सांगण्यात येणार असल्याचेही सांगींतले. तर १४ एप्रिल रोजी वैद्यकीय महाविद्यालय परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय महाविद्यालय या नामफलकाचे अनावरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगीतले.
जिल्हा क्रीडा संकुलास राजाभोज यांचे नाव
By admin | Published: February 22, 2016 1:52 AM