आॅनलाईन लोकमतगोंदिया : जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी मंगळवारी (दि.३०) निवडणूक होणार आहे. यात काँग्रेसचे दोन आणि भाजपचे दोन सभापती होणे निश्चित झाले आहे. तर चारही सभापतीपदासाठी नावे देखील फिक्स झाली असून त्याची केवळ औपचारीक घोषणा होण्याची प्रतीक्षा आहे.येथील जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ सर्वाधिक असले तरी केवळ राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने हातात कमळ घेत जि.प.मध्ये सत्ता स्थापन केली. त्यामुळे राष्ट्रवादीला सत्तेपासून दूर राहावे लागले. भाजपपेक्षा काँग्रेसचे संख्याबळ कमी असताना देखील काँग्रेसने अध्यक्षपद स्वत:च्या पारड्यात पाडून घेतले. तर भाजपने उपाध्यक्षपदावर समाधान मानले. या समीकरणावर काँग्रेस व भाजपाच्या नेत्यांनी स्थानिक पातळीवरील समझोता असल्याचे व अडीच वर्षापूर्वी जि.प.मध्ये केलेल्या युतीचा धर्म पाळल्याचे सांगत वेळ मारुन नेली. त्यानंतर आता जि.प.विषय समिती सभापती पदासाठी मंगळवारी (दि.३०) रोजी निवडणूक होत आहे. यात देखील अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणुकीच्या वेळचे सूत्र कायम राहणार आहे. काँग्रेसला दोन आणि भाजपला दोन सभापती पदे देण्याचे निश्चित झाले आहे. सभापतीपदासाठी काँग्रेसकडून गिरीश पालीवाल, लता दोनोडे, रमेश अंबुले यांची नावे चर्चेत आहेत. तर भाजपकडून तेजुकला गहाणे, रजनी कुमरे यांची नावे चर्चेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिक्षण व महिला बाल कल्याण सभापतीपद हे काँग्रेसकडे तर कृषी व पशुसंवर्धन आणि समाजकल्याण सभापतीपद हे भाजपकडे जाणार आहे.शिक्षण सभापतीपदाकरिता अंबुले, महिला बाल कल्याणकरिता दोनोडे, समाजकल्याण सभापती पदाकरिता कुमरे आणि कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदाकरिता गहाणे यांची नावे जवळपास निश्चित झाल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांच्या फार्मुल्यात वेळेवर काही बदल झाल्यास नावात बदल होवू शकतो. मात्र तसे होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलल्या जाते. मंगळवारी दुपारी २ वाजतानंतर सभापतीपदाचे अंतीम चित्र स्पष्ट होणार आहे.
नावे फिक्स केवळ घोषणेची औपचारिकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 9:05 PM
जिल्हा परिषद विषय समिती सभापतीपदासाठी मंगळवारी (दि.३०) निवडणूक होणार आहे. यात काँग्रेसचे दोन आणि भाजपचे दोन सभापती होणे निश्चित झाले आहे.
ठळक मुद्देजि.प.सभापती निवडणूक : टू बाय टू चा फॉर्म्यूला