गोंदिया : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे योगदान विसरणारे नसून, स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती देत देशाला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त केले. त्यावेळीही आताच्या भाजप म्हणजे जनसंघासह आरएसएसच्या लोकांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला नाही. त्यांनी नेहमीच स्वातंत्र्य लढ्याच्या विरोधातच काम केल्याने त्यांच्याकडून देशहिताची अपेक्षा करणे चुकीचे आहे. ते देशद्रोहींना पाठिंबा देणारे असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केले.
गोंदिया येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित जिल्हा मेळावा व पदग्रहण सोहळ्यासाठी आले असता पत्रकार परिषदेत पटोले बोलत होते. ज्या सिनेअभिनेत्रीला केंद्र सरकारने ‘पद्मश्री’करिता निवडले, तिने देशाच्या स्वातंत्र्यावरच आक्षेप घेणे म्हणजे स्वातंत्र्य लढ्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांच्याच नव्हे तर त्यांच्या कुटुबीयांसह सर्व देशवासीयांचा अवमान केलेला आहे. यापूर्वीसुद्धा याच अभिनेत्रीने मुंबईला पीओके म्हणत आपल्या अकलेचे तारे तोडले होते. अशा अभिनेत्रीला दिलेला पद्मश्री पुरस्कार लगेच परत घ्यायला हवे. परंतु, केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार हे आरएसएसच्या अजेंड्यावर काम करीत असल्याने त्यांच्याकडून अपेक्षा बाळगणे चुकीचे असल्याचे सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावरच
काँग्रेस पक्ष नेहमीच आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी पुढे राहिलेला असून, आजपर्यंत झालेल्या सर्वच पोटनिवडणुका व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षच आघाडीवर राहिलेला आहे. त्यामुळे येत्या जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या काँग्रेस पक्षाला बळकट करण्याच्या दृष्टीनेच स्वबळावर लढण्याचा इशारा नाना पटोले यांनी दिला.
धानाला बोनस मिळण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा सुरू
गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने धानाला ७०० रुपये बोनस मिळत आहे. यापूर्वी कोरोनाची परिस्थिती जेवढी भयावह होती, त्यास्थितीत शेतकऱ्यांना महाविकास आघाडी सरकार बोनस देऊ शकते, तर सध्या तर कोरोना नियंत्रणात आला असून सरकार आता कामाला लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यावेळीही बोनस मिळेल यासाठी विधानसभेत सरकारसोबत चर्चा करणार असल्याचे सांगितले.