गोंदिया : आई-वडिलांचे छत्र हिरावलेल्या दोन चिमुकल्यांना म्हाताऱ्या आजी शिवाय कुणाचाच आधार नव्हता. अशात त्या निरागस चिमुकल्यांचे काय असा प्रश्न निर्माण झाला. हसण्या बागडण्याच्या व आई-वडिलांचे बोट धरुन चालण्याच्या वयात नियतीने त्यांचा आधारच हिरावला. आई-वडिलांमुळे अनाथ झालेल्या दोन चिमुकल्यांच्या मदतीला जिल्हाधिकारी आणि त्यांचे अधिनस्त अधिकारी धावून आले. मदतीचा हात पुढे करीत त्या चिमुकल्यांची जबाबदारी स्वीकारत ते अनाथांचे नाथ झाले.
गोरेगाव तालुक्यातील खाडीपार येथील गावकऱ्यांना गुरुवारी (दि.२४) प्रशासनातील माणुसकी आणि आपुलकीचे दर्शन घडले. आई- वडिलांच्या मृत्यूमुळे अनाथ झालेल्या एक चार वर्षीय आणि एक दोन वर्षीय चिमुकल्यांपर्यंत स्वत: जिल्हाधिकारी राजेश खवले पोहचले. त्या दोन चिमुकल्यांचा आधार असलेल्या वृध्द आजीला धीर देत तुमचा एक मुलगा गेला तरी हा तुमचा दुसरा मुलगा सक्षम आहे. तुम्ही काळजी करु नका. प्रशासन तुमच्या सदैव सोबत आहे असा धीर जिल्हाधिकारी खवले यांनी त्या वृद्ध आजीला दिला. या शब्दांनी आजीचे डोळे देखील पाणावले. स्वत: जिल्हाधिकारी आपल्या दारापर्यंत येऊन आपल्याला मदत करतील अशी कल्पनाच तिने कधी केली नव्हती. जिल्हाधिकाऱ्यांनी आजीची आणि त्या दोन चिमुकल्यांची विचारपूस करुन दहा हजार रुपयांची रोख मदत दिली. तसेच यापुढे देखील दर महिन्याला ही मदत तुमचा हा मुलगा तुमच्यापर्यंत पोहचवीत राहील अशी ग्वाही देखील जिल्हाधिकाऱ्यांनी आजीला दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी या दोन अनाथ चिमुकल्यांचे नाथ हाेण्याचे आवाहन अधिकाऱ्यांच्या व्हाॅटसॲपवर केले होते. त्यानंतर २० अधिकाऱ्यांनी पुढे येत या दोन चिमुकल्यांचे आयुष्यभराचे नाथ होण्याचा संकल्प केला. तसेच नियमित या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची ग्वाही दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी अजय नष्टे, प्रभारी तहसीलदार नरेश वेदी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे, सरपंच दिनेश टेकाम, पोलीस पाटील देवानंद कोटांगले उपस्थित होते.
...........
हे अधिकारी देणार दरमहा मदत
जिल्हाधिकारी राजेश खवले, उपवनसंरक्षक कुलराजसिंग, अप्पर जिल्हाधिकारी अशोक पाटील, अप्पर जिल्हाधिकारी नंदिनी आवळे, उपजिल्हाधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गणेश घोरपडे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, शिक्षणाधिकारी प्रफुल कचवे, जिल्हा उपनिबंधक शुद्धोधन कांबळे, तहसीलदार उषा चौधरी, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक उदय खर्डेनवीस, कार्यकारी अभियंता अब्दुल जावेद, कार्यकारी अभियंता अमृतराज पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमरीश मोहबे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक प्रवीण तांबे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार, जिल्हा खनिकर्म अधिकारी सचिन वाढीवे, राहुल तिवारी, माधवी सरदेशमुख अशी मदत देणाऱ्या अधिकाऱ्यांची नावे आहे.
............
धनाने नव्हे मनाने श्रीमंत असण्याची गरज
जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यामार्फत या कुटुंबाला बालकांच्या संगोपनाकरिताचा लाभ मिळवून देण्यात येत आहे. तहसीलदार यांनी या कुटुंबाला स्वस्त धान्य आणि सामाजिक सहायता योजनेचा लाभ देखील मिळवून देण्याची कार्यवाही सुरु केलेली आहे. चांगल्या कामासाठी माणूस धनातून श्रीमंत असणे आवश्यक नाही, तर मनातून श्रीमंत असणे आवश्यक आहे.
..............
कोट
ही मदत केवळ एका महिन्यापुरती किंवा एकाच वेळेपुरती मर्यादित नसून जोपर्यंत हे कुटुंब स्थिर होत नाही तोपर्यंत त्या कुटुंबाला मदत केली जाणार आहे. दोन अनाथ मुलींना सांभाळणाऱ्या आजीचे वय ८० वर्ष आहे. हे विचारात घेऊन मुलींच्या भविष्यकालीन व्यवस्थेचे देखील नियोजन २० अधिकाऱ्यांनी केले आहे.
- राजेश खवले, जिल्हाधिकारी.