गणेश बोडदे यांचे प्रतिपादन : बोरी येथे बालसुसंस्कार शिबिर लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : राष्ट्रपुरुषांच्या विचारांनी व क्रांतीकारींच्या बलीदानाने देश स्वतंत्र झाला. ते स्वातंत्र्य टिकवून फुले, शाहू, आंबेडकरांच्या विचारांनी देश आबाधीत राखायचा आहे. त्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांनी प्रेरीत झालेले वालक उद्याचे राष्ट्रसंरक्षक बनवायचे आहेत. श्री गुरुदेव सेवा मंडळ, राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकूंज मोझरी द्वारे संचालीत बालसुसंस्कार शिबिरातून घडलेले बालक उद्याच्या राष्ट्राचे भविष्य असल्याचे प्रतिपादन शिबिर प्रमुख गणेश बोदडे यांनी केले. बोरी येथे श्री गुरुदेव सेवा मंडळ व राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज मोझरी द्वारे दहा दिवसीय बालसुसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वप्नील दादा इंगोले, प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत झोडे, तंमुस अध्यक्ष पाडुरंग ठाकरे, मुरलीधर ठाकरे, भोजराम रहेले, विजय राठौड, दुर्योधन मैंद, कृष्णकांत खोटेले, अनिल शिवणकर, हिरालाल घोरमोडे, संजय राऊत, उध्दव मेहेंदळे, प्रा. सुनील पाऊलझगडे, तानाजी कोरे, अंबादास कोरे उपस्थित होते. सलग पाच वर्षापासून बोरी येथे संस्कार शिबिर सुरु आहे. आता हे संस्कार शिबिर तालुक्यात इतरत्र सुरु झाले आहे. यावेळी प्रास्ताविक करतांना दुर्योधन मैंद म्हणाले, की महापुरुषांच्या विचारांचा वारसा चालविण्याची आज खरी गरज आहे. देशाला सुसंस्कारीत बालकांची गरज आहे. आजचे हे बालक राष्ट्राची खरी संपत्ती आहेत. या शिबिरात जात, पात, पंथ, पक्ष यासारख्यांना थारा नसून सर्वांसाठी खुले असल्याचे सांगितले. शिबिरात अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रा. एस.एस.चव्हाण, प्रा. भगवंत फुलकटवार यांनी अंधश्रध्दा निर्मुलनावर आधारीत प्रात्यक्षिक दाखविले. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वप्नील दादा इंगोले म्हणाले, उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये शाळेतील मुलांवर याद्वारे सुसंस्कार घडविण्यासाठीचे शिबिर बालकांना चिरंतर प्रेरणा देत राहील, आत्मसंरक्षण, व्यायाम, महापुरुषांचे विचार मोठ्यांचा आदर, निरोगी पिढी, एवढेच नव्हे तर हे बालक कधीच व्यसनाधीन होणार नसल्याने ते स्वत:चे व देशाचे भविष्य घडविणार आहेत. यावेळी डॉ. प्रशांत झोडे यांनी सुध्दा शिबिरार्थ्यांना संबोधीत केले. दरवर्षीच्या या शिबिराचे श्री गुरुदेव सेवा मंडळ व बोरी ग्रामस्थांसाठी निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराला मोठ्या प्रमाणात विद्यार्थी उपस्थित होते. शिबिर प्रमुख गणेश बोदडे, रवी गायकवाड, पवन धानोरकर, समर्थ लांडे इतरांनी दहा दिवस मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे शिबिराचे मल्लखांत हे वैशिष्ट ठरले होते. मल्लखांबावरील चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी संस्कारीत बालकांनी वाहवा मिळविली. श्री गुरुदेवाच्या ग्रामगीता व इतर साहीत्याची मोठी विक्री सुध्दा झाली. संचालन भूपेंद्र चौव्हान व आभार सोमेश्वर सौंदरकर यांनी मानले. शिबिराच्या यशस्वीतेकरीता हिरालाल ठाकरे, लहुजी दोनाडकर, किशोर दोनाडकर, आत्माराम कोरे, ग्रामपंचायत तंटामुक्त समितीचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी सहकार्य केले.
राष्ट्रसंत वाणीतून देश घडणार
By admin | Published: June 01, 2017 1:06 AM