बोंडगावदेवी : ग्राम गौरनगर येथील जयदुर्गा हायस्कूल तथा ज्युनिअर कॉलेजच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे औचित्य साधून गावासह नजीकच्या परिसरात ग्राम स्वच्छता मोहीम राबवून रासेयोचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला.
या विद्यालयात सन २०११ मध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे पथक स्थापन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या पथकाच्या माध्यमातून परिसरातील गावात निवासी शिबिराच्या माध्यमातून श्रमदान तसेच पथनाट्याच्या निर्मितीमधून ज्वलंत विषयांवर सादरीकरण करून जनजागृती केली जाते. राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाचे औचित्य साधून गौरनगर, कोरंभीटोला, आसोली, मांडोखाल, खामखुरा, जानवा, येगाव, ईटखेडा, माहुरकुडा या ठिकाणी विद्यार्थ्यांनी ग्रामसफाई करून स्वच्छता मोहीम राबविली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुनील पाऊलझगडे होते. विद्यार्थ्यांशी हितगूज साधताना प्राचार्य म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये जिद्द, चिकाटी निर्माण होऊन शिस्तप्रिय विद्यार्थी बनतो. सुसंस्काराचे बाळकडू मिळते. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे प्रभारी भूवेंद्र चव्हाण यांनी केले तर आभार कांतीकुमार बोरकर यांनी मानले.