सडक-अर्जुनी : केंद्र शासनाने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीमुळे देशातील व्यापारी, शेतकरी, शेतमजूर व सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात आर्थिक त्रास होत आहे. त्याच्या निषेधार्थ सडक-अर्जुनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे ९ जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. तहसीलदार विठ्ठल परळीकर यांना राष्ट्रवादी पक्षाकडून निवेदन देण्यात आले. त्यामध्ये नोटाबंदीमुळे देशात आर्थिक आणिबाणी निर्माण झाल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे नोटासंबधीचे सर्व आर्थिक निर्बंध हटविण्यात यावे. सर्व नागरिकांच्या हक्काचे पैसे जे बँकेत आहे ते कोणत्याही परिस्थितीत निर्बंधाशिवाय मागणी नुसार देण्यात यावे, पेट्रोल पंप, रेशन दुकानदार, कृषी दुकानदार, औषध दुकानदार व इतर सर्व नागरिकांना कॅशलेस व्यवहारांची शक्ती करू नये अशा मागण्यांचे पत्र पंतप्रधान भारत सरकार, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे नावे तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादीचे प्रदेश सदस्य मनोहरराव चंद्रिकापुरे, जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर, जि.प.सदस्य रमेश चुटे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ. अविनाश काशिवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आनंद अग्रवाल, नगरपंचायतचे नगरसेवक देवचंद तरोणे, माजी पं.स.सभापती वंदना डोंगरवार, तालुका राष्ट्रवादी महिलाध्यक्षा रजनी गिऱ्हेपुंजे, नगरसेविका मुनिश्वर, एफ.आर.टी.शहार, देवाजी बनकर उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
नोटाबंदी विरोधात राष्ट्रवादीचे धरणे आंदोलन
By admin | Published: January 10, 2017 12:25 AM