राज्य शासन आणि नाबार्डने यंदा खरीप हंगामासाठी एकूण ३०० कोटी रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. यासाठी जिल्हा बँकेला १६७ कोटी ८५ लाख, राष्ट्रीयीकृत बँकांना ९ कोटी १६ लाख आणि ग्रामीण बँकांना ३ कोटी ६० लाख रुपयांच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करण्यास सांगितले आहे. खरीप हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि शेतीच्या मशागतीची कामे करण्यासाठी पैशाची गरज आहे. पैशाची गरज भागविण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारांच्या दारात उभे राहण्याची वेळ येऊ नये यासाठी पीक कर्ज उपलब्ध करुन दिले आहे. याअंतर्गत आतापर्यंत जिल्हा बँकेने सर्वाधिक ६९ कोटी ६६ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकांनी ६२ लाख २३ हजार रुपये आणि ग्रामीण बँकेने १ कोटी १२ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप करण्यात आले आहे.
..............
१८ हजार शेतकऱ्यांनी केली पीक कर्जाची उचल
खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपाला सुरुवात होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. याअंतर्गत आतापर्यंत एकूण १८ हजार शेतकऱ्यांना ८७ कोटी १० लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप तिन्ही बँकांनी केले आहे. जिल्ह्यात अडीच लाखावर शेतकरी असून दरवर्षी जवळपास दीड लाख शेतकरी खरीप हंगामासाठी पीक कर्जाची उचल करतात. पीक कर्ज वाटपाची स्थिती पाहता सर्वाधिक ४० टक्के पीक कर्जाचे वाटप हे गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केले आहे.
..............
बँकांमध्ये वाढली शेतकऱ्यांची गर्दी
यंदा रब्बी हंगामातील धान खरेदीची समस्या कायम असल्याने शेतकरी याच प्रक्रियेत बराच अडकला आहे. मात्र तोडगा निघत नसल्याने शेतकरी आता पीक कर्जाची उचल करण्यासाठी बँकांमध्ये गर्दी करीत आहेत. जिल्हा बँक ही शेतकऱ्यांना आपली बँक वाटत असल्याने शेतकरी सर्वाधिक पीक कर्जाची उचल करण्यासाठी याच बँकेत गर्दी करीत आहेत.
.................
बँका उद्दिष्ट कर्ज वाटप टक्के
जिल्हा बँक १६७ कोटी ८५ लाख ६९ कोटी ६६ लाख रुपये ४०.३६
व्यापारी बँक ९ कोटी ६१ लाख ६२ लाख २३ हजार ६.००
ग्रामीण बँक ३ कोटी ६० लाख १ कोटी १२ लाख २८.०२