गोंदिया : राज्यात २ कोटी वृक्ष लागवड करण्याच्या मोहिमेला जिल्ह्यात अक्षरश: लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाल्याचे चित्र शुक्रवारी जिल्हाभरात दिसून आले. एकाच दिवशी तब्बल साडेनऊ लाखांपेक्षा अधिक रोपट्यांची लागवड करण्याचा हा विक्रम जिल्ह्यात पहिल्यांदाच घडला आहे. यात सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसह सामाजिक संघटना, शाळकरी विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.आबालवृध्द, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, विविध यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, विविध शाळांचे विद्यार्थी, एवढेच नाही तर पत्रकारसुद्धा या वृक्ष लागवड मोहिमेत सकाळपासूनच सहभागी झाले होते. काही ठिकाणी तर सामाजिक संघटनांनी जनजागृती गाण्यांच्या तालावर वृक्षलागवड केली. यात सहभागी होणाऱ्यांसाठी चहा-नास्त्यासह पाण्याची व्यवस्था केली होती. अगदी मतीमंद शाळांचे विद्यार्थीसुद्धा या मोहीमेपासून दूर नव्हते. वृक्षलागवड आपली जबाबदारी असल्याची भावना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होती.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी कदंबाचे रोपटे लावले. यावेळी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.डी.शिंदे, जिल्हा कोषागार अधिकारी दिगंबर नेमाडे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा पुरवठा अधिकारी ए.के.सवई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण केले. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासू दडी मारून बसलेल्या पावसानेही आज चांगलीच हजेरी लावली. दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस बरसला. त्यामुळे पावसात भिजतच वृक्षारोपणाचे हे काम सुरू होते.वृक्ष लागवडीसोबत संवर्धनही महत्वाचे- पालकमंत्रीलोकचळवळ झालेल्या या वृक्षारोपण कार्यक्रमामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मोठी मदत होणार आहे. आता वृक्ष लागवडीसोबतच त्यांचे संवर्धनही करणे महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.डव्वा येथील सामाजिक न्याय विभागाच्या निवासी शाळेसमोरील वन विभागाच्या जागेवर जैवविविधता समिती डव्वाच्या वतीने आयोजित वृक्ष लागवड कार्यक्र मात अध्यक्षस्थानावरु न पालकमंत्री बडोले बोलत होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून पालक सचिव डॉ.पी.एस.मीना यांची तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी, उपवनसंरक्षक डॉ.जितेंद्र रामगावकर, जि.प.सदस्य गंगाधर परशूरामकर, सडक/अर्जुनीच्या पंचायत समतिी सभापती कविता रंगारी, पंचायत समतिी सदस्य जयशिल जोशी, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक पी.एस.बडगे, डव्वाच्या सरपंच शारदा किरसान यांची उपस्थिती होती.डॉ. पी.एस.मीना म्हणाले, आजचा दिवस हा विशेष आहे. झाड लावा झाड जगवा याचा बोध या प्रत्येकाने घेतला पाहिजे. आजपर्यंत वृक्षतोड खूप झाली आहे. त्यामुळे भविष्यात वृक्षतोड होणार नाही याची काळजी घ्यावी. वृक्षांपासून आपल्याला आॅक्सिजन मिळते त्यामुळे जिवंत राहण्यास वृक्षांची महत्वाची मदत होते. वृक्ष लागवडीचा हा कार्यक्र म इथेच न थांबवता आणखीही यापुढे मोठ्या संख्येने झाडे लावावे व त्याचे संगोपन प्रत्येकाने करावे. झाडाचे अनेक फायदे असल्यामुळे त्याची काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.प्रास्ताविकातून उपवनसंरक्षक डॉ. रामगावकर माहिती देताना म्हणाले, डव्वा येथील वनविभागाच्या १५ हेक्टर जमीनीवर १६ हजार झाडे लावण्यात येत आहेत. झाडांची काळजी व त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी डव्वा येथील जैवविविधता समितीकडे देण्यात आली आहे. भविष्यात या जमिनीवर वनऔषधीची झाडेही लावण्यात येतील. इथे चांगले जंगल या वृक्षलागवडीतून निर्माण होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाला वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी, डव्वा येथील ग्रामपंचायतचे पदाधिकारी, जैवविविधता समतिीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. संचालन विकास चव्हाण यांनी मानले.
वृक्षारोपणाला आले लोकचळवळीचे स्वरु प
By admin | Published: July 02, 2016 1:50 AM