सडक-अर्जुनी (गोंदिया) : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांचे दर्शन होत असल्याने उन्हाळ्याचे तीन महिने वन पर्यटनाचा हंगाम असे म्हणता येते. यामुळेच नवेगाव अभयारण्यात सध्या जंगल सफारीसाठी पर्यटकांची गर्दी वाढल्याचे दिसत असून, अभयारण्य पर्यटकांनी ‘हाऊसफुल्ल’ झाले आहे.
तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांच्या मधोमध असलेले नागझिरा अभयारण्य नवेगाव राष्ट्रीय उद्यान १३३.८८० चौरस किमी, नवेगाव वन्यजीव अभयारण्य १२२.७५६ चौरस किमी, नागझिरा वन्यजीव अभयारण्य १५२.८१० चौरस किमी, नवीन नागझिरा अभयारण्य १५१.३३५ चौरस किमी आणि कोका वन्यजीव अभयारण्य ९७.६२४ चौरस किमी क्षेत्र मिळून तयार झाले आहे. यात बकी गवत कुरण ५६ हेक्टर आर क्षेत्रात, कालीमाती गवत कुरण ६८ हेक्टर आर क्षेत्रात तर कवलेवाडा गवत कुरण हे १०० हेक्टर क्षेत्रात व्यापले आहे. सध्या उन्हाळा सुरू असून, मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचे दर्शन पर्यटकांना होत असल्याने नवेगाव अभयारण्यात सध्या चांगलीच गर्दी वाढली आहे. सडक-अर्जुनी तालुक्यालगत असलेल्या नवेगाव अभयारण्यात जाण्यासाठी खोली गेट, बकी गेट आणि जांभळी गेट सुरू आहेत. येथून सकाळ फेरीत आणि दुपारच्या फेरीत पर्यटकांची गर्दी वाढलेली दिसत आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ लगत असलेल्या बकी गेटमधून आत पर्यटनासाठी गेले असता, नीलगाय, सांबर, चितळ, अस्वल, बिबट, रानकुत्रे, चौसिंगा, मोर, रानडुक्कर, भेडकी, वाघ इत्यादी प्राणी हमखास पाहायला मिळतात. बकी गेटमधून आत निसर्गाचा आनंद घेत असताना जांभूळझरी, बदबदा, तेलनझरी, गोपीचूहा, आगेझरी, थाटरेमारी, सालाई झरी असे विविध नैसर्गिक व कृत्रिम झरे पाहायला मिळतात. बकी गेट येथे वनरक्षक अनिता शहारे तर खोली गेट येथे वनरक्षक सोनाली मेश्राम या कार्यरत आहेत.
पर्यटकांना पर्यटनाची इत्यंभूत माहिती देण्यासाठी प्रशिक्षित गाईडची सुविधा केली आहे. नवेगाव अभयारण्यात काळीमाती, टिके जॉईंट, रांजीटोक असे आकर्षक कॅम्प तयार करण्यात आले आहेत. सध्या वाघाचे दर्शन होत असल्याने तिन्ही गेट हाऊसफुल्ल सुरू असल्याचे चित्र नवेगाव अभयारण्यात पाहायला मिळत आहे.
१ जुलैपासून जंगल सफारी होणार बंद
- उन्हाळ्याच्या दिवसात जंगल सफारीचा हंगामच असतो. मात्र, पाऊस सुरू झाल्यानंतर जंगलात पर्यटकांना प्रवेशबंदी केली जाते व जंगल सफारी बंद होते. पावसाळा प्रजननाचा काळ असून, पावसामुळे आतील रस्तेही खराब होतात. अशात पर्यटकांसाठी प्रवेश बंद केले जाते.