दहशत संपली : तंटामुक्त सदस्यांचा सहभागगोंदिया : शासनाने अमंलात आणलेल्या तंटामुक्त मोहिमने आदिवासी जनता व पोलीसांना जोडण्याची कामे केली. ज्या गावात शासनाच्या योजनांना थारा नव्हता त्या गावात तंटामुक्त मोहीमेला हिरहिरीने राबविले. तंटामुक्त मोहीमेला नक्षलवाद्यांनी टार्गेट केले होते. परंतु नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता गोंदिया जिल्ह्यातील ११४ नक्षलग्रस्त अतिसंवेननशिल गावात लोकचळवळ उभी झाली आहे. ही मोहीम सुरू होण्यापुर्वी नक्षलग्रस्त गावात शासकीय योजनांना राबविण्यास नागरिकांमध्ये उदासिनता होती. मात्र तंटामुक्त मोहीमेत लोकसहभाग असल्याने गावातील नागरीक या मोहीमेशी जुळले. या मोहीमेला लोकचळवळीचा आधार मिळाला. नक्षलग्रस्त गावात पोलिसांशी बोलण्यास आदिवासी तयार नव्हते. त्या गावात या तंटामुक्त मोहीमेमुळे आदिवासी जनता व पोलीस यांच्यातील दुरावा कमी करून त्यांचे मने जोडली. नक्षल चळवळीची माहिती पोलिसांना मिळण्यास या मोहीमेची बरीच मदत झाली. आदिवासी जनता व पोलीस या मोहीमेने जवळील आल्याने नक्षलवाद्यांनी या तंटामुक्त मोहीमेला टार्गेट केले. पाच वर्षापुर्वी नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून तंटामुक्त मोहीम बंद करा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा, अशी धमकी दिली होती. परंतु आता तंटामुक्त गावात नक्षलवाद्यांच्या धमक्यांना न जुमानता महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीमेचे काम सदस्य करीत आहेत. नक्षलवाद्यांची दहशत आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात होती. आता ती दहशत राहीली नसून तंटामुक्त मोहीमेच्या रूपाने पुन्हा लोकचळवळ उभी झाली आहे. (तालुका प्रतिनिधी)
नक्षलग्रस्त ११४ गावात लोकचळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 12:16 AM