विजय मानकर लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : जिल्ह्यातील सर्वात जास्त अतिसंवेदशील व नक्षलग्रस्त भागात असलेल्या दरेकसा परिसराची आरोग्य सेवा कोलमडली असून, रुग्णसेवा वाऱ्यावर आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा व प्रशासन गाढ झोपेत आहे. या भागात एकीकडे मलेरियाचे थैमान असून, येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात मागील एका वर्षापासून प्रयोगशाळा तंत्रज्ञ नाही आहे. त्यामुळे मलेरिया नमुना रक्त तपासणी वेळेवर होत नाही आणि त्वरित मलेरियाचे निदान होत नाही. मात्र यानंतरही आरोग्य विभागाने रिक्त पदे भरली नसल्याने आदिवासीबहुल भागातील आरोग्य सेवा वाऱ्यावर असल्याचे चित्र आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र दरेकसा येथे लोकमत प्रतिनिधीने भेट दिली असता येथील नियमित वैद्यकीय अधिकारी रजेवर गेलेले असल्याचे सांगितले. दुसरे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह संपर्क साधला असता ते प्रशिक्षणासाठी गेल्याचे त्यांनी सांगितले. तर फिरते आरोग्य पथकात काम करणारे डाॅक्टर येथे बाह्यरुग्ण तपासणी करण्याचे काम करीत असल्याचे दिसून आले. या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काही आरोग्य कर्मचाऱ्यांचे पद रिक्त असून, या सर्वात महत्त्वाचा पद म्हणजे नमुना तपासणी करणारा प्रयोगशाळा तंत्रज्ञ कोणीच नाही. अशात येथील डॉक्टर रुग्णांना थेट सालेकसा रेफर करण्याचे काम करीत आहे. या महिन्यात मलेरिया रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आणि आरोग्य विभागात धावपड सुरू झाली. अशात तालुका आरोग्य यंत्रणेने खासगी प्रयोगशाळा तंत्रज्ञान तात्पुरत्या स्वरूपात बोलावून स्लाइट तपासणीची कामे करवून घेतले. मलेरियाची परिस्थिती एवढी गंभीर झाली असली तरी आरोग्य विभागाने नियमित कर्मचाऱ्यांची व्यवस्था केली नाही.
दरेकसा येथे जाण्यास भाग पाडले - मागील एक वर्षापूर्वीपर्यंत कार्यरत असलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञाने या प्राथमिक आरोग्य केंद्रात सतत नऊ वर्षे आणि त्यापूर्वीसुध्दा तीन वर्षे असे एकूण १२ वर्षें सेवा दिली. मागील वर्षी त्याची बदली झाली. तरीसुध्दा बदली झाल्यावर त्यांनी मलेरियाची गंभीर परिस्थिती पाहून सहा महिने आणखी राहून सेवा दिली. परंतु त्यांच्या जागी दुसऱ्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ पाठविण्याची गरज होती; पण एक वर्ष लोटूनसुध्दा जिल्हा प्रशासनाला जाग आली नाही. आता हिवतापाचा कहर वाढला आहे. जिल्ह्यात बदली सत्रसुध्दा सुरू आहे. अशात प्रशासनाने नवीन प्रयोगशाळा तंत्रज्ञ येथे पाठवून समस्या दूर करण्याची गरज आहे.
संवेदनशील भागात उधारीचे कर्मचारी का? - दरेकसा परिसर अतिदुर्गम व डोंगराळ भागात असून, या भागात घनदाट वनाच्छादित क्षेत्र असल्याने या भागात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असल्याने हिवतापाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असतो. अशात या भागात रुग्णसेवा देण्यासाठी नियमित व अतिरिक्त प्रयोगशाळा तंत्रज्ञ असणे आवश्यक आहे; परंतु येेथे नियमित प्रयोगशाळा तंत्रज्ञाचे पद एक वर्षापासून रिक्त असून, मागील फेब्रुवारी महिन्यापासून नमुना रक्त तपासणीचे काम बंद असल्यासारखे आहे.