गोंदिया : लगतच्या मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या कारवाया वाढताना दिसून येत असतानाच शनिवारी (दि.४) पहाटे ४ वाजतादरम्यान मोठ्या संख्येत असलेल्या नक्षलवाद्यांनी मछुरडा व देवरबोली चौकाअंतर्गत रस्ता बांधकामावर असलेला रोडरोलर जाळला.
माहितीनुसार, १० कोटी रुपयांच्या निधीतून देवरबोलीपासून मालकुंआ दरम्यान १२ किलोमीटर रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामाचे कंत्राट रायसिंग अँड कंपनीकडे असून ते काम करीत असून तेथे हा रोडरोलर सुरू होता. शनिवारी (दि.४) पहाटे ४ वाजतादरम्यान सुमारे ४० महिला नक्षलींसोबत असलेल्या सक्षस्त्र नक्षलवाद्यांनी तेथे धडक देत कॉम्रेड जीवा ऊर्फ मिलिंद तेलतुंबडे याच्या हत्येचा विरोध केला. तसेच, येत्या १० तारखेपासून मध्य प्रदेश-छत्तीसगढ व महाराष्ट्र राज्य बंद करण्याची मागणी करीत रोडरोलरला आग लावली.
या घटनेमुळे घाबरून मजूर कामावरून परतून गेले. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे ४ वाजता धडकलेले नक्षलवादी सकाळी ८ वाजतापर्यंत घटनास्थळीच होते. यादरम्यान त्यांनी लाल कापडी बॅनरमधून कॉम्रेड तेलतुंबडे याच्या हत्येचा निषेध केला. तसेच लाल बॅनर व पत्रकसुद्धा घटनास्थळी सोडले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सर्चिंग ऑपरेशन अधिक वेगाने सुरू केले आहे.
विशेष म्हणजे, मागील २ वर्षांत नक्षलींना घेऊन मोठ्या प्रमाणात घटना घडल्या आहेत. यामध्ये १० जुलै २०२० रोजी लांजी क्षेत्रातील देवरबोली चौकीअंतर्गत पुजारीटोला येथे पोलीस चकमकीत पोलिसांनी मंगेश व नंदा या दोन नक्षलींना ठार केले. १७ नोव्हेंबर २०२० रोजी बालाघाट पोलिसांनी ८ रुपयांचा नक्षली बादल ऊर्फ कोसा याला जीवित पकडले होते. ६ नोव्हेंबर २०२० रोजी चकमकीत महिला नक्षली शारदा ऊर्फ पुज्जे हिला ठार केले. १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नक्षल्यांनी मालखेडी येथे पोलीस मुखबिर असल्याच्या संशयातून संतोष यादव व जगदीश पटले यांना घरून उचलून नेले व १३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ वाजता ठार केले होते. २९ नोव्हेंबर रोजी सोनगुड्डा-चारघाट नाला मार्गावर नक्षली पत्रक मिळाले असून यापूर्वी किस नदी काठावरही नक्षल्यांनी टाकलेले पत्रक मिळून आले होते. तर आता ४ डिसेंबर रोजी नक्षल्यांनी रोडरोलर जाळल्याची घटना घडली आहे.